नव्या पिढीचे क्षेपणास्त्र: ओडिशातील तळावरून चाचणी
दि. ०४ एप्रिल: संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) व सामरिक सेना मुख्यालाच्यावतीने (एसएफसी) ‘अग्नी-प्राइम’ या नव्या पिढीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटांवरून बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी या यशस्वी चाचणीबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटांवरून बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी ठेवण्यात आलेली उद्दिष्टे व चाचणीचे निकष या क्षेपणास्त्राने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या चाचणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी संवेदक बसविण्यात आले होते, त्याचबरोबर समुद्रात तैनात करण्यात आलेल्या जहाजावरुनही संवेदकाच्या माध्यमातून या चाचणीचे परीक्षण करण्यात आले. या सर्व संवेदकांच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून ही चाचणी यशस्वी झाल्याचे सिद्ध होते, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. या चाचणीप्रसंगी संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान व सामरिक सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते.
‘अग्नी-प्राइम या क्षेपणास्त्राची यशवी चाचणी व त्याच्या सैन्यातील समावेशामुळे भारताच्या सैन्यदलांची ताकद अधिक वाढणार आहे. या यशाबद्दल मी ‘डीआरडीओ’, ‘एसएफसी’ व सैन्यदलांचे अभिनंदन करतो,’ असे राजनाथसिंग यांनी म्हटले आहे. संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, संरक्षण मंत्रालयाच्या संश्धन व विकास विभागाचे सचिव व ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर कामात यांनीही ‘डीआरडीओ’, ‘एसएफसी’ यांचे यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी