अमेरिकेकडून युक्रेनला तातडीची मदत

0
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुविल्लन

तीनशे दशलक्ष डॉलर: कॉंग्रेसमध्ये गतिरोध जारीच

दि. १३ मार्च: युद्धामुळे मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी व रशियाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी अमेरिकेने अखेर तीनशे दशलक्ष डॉलरची मदत युक्रेनसाठी जाहीर केली आहे. युक्रेनच्या मदतीकरीता २०२४मध्ये एकूण साठ अब्ज डॉलरच्या मदतीचे ‘पॅकेज’ अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या पक्षीय राजकारणामुळे अमेरिकी कॉंग्रेसमध्ये या मदतीवरून गतिरोध जारीच आहे.

रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सरू झाल्यापासूनच रशियाच्या आक्रमतेत भाजून निघत असलेल्या युक्रेनला मदत करण्याबाबत अमेरिकेवर मोठा दबाव होता. तेथील हितसंबंध जपण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती. त्या गरजेतूनच ही तातडीची मदत दिल्यात आल्याचे समजते. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुविल्लन यांनी या मदतीचे स्वरूप स्पष्ट केले. त्यामध्ये तोफखान्यासाठी लागणाऱ्या तोफ गोळ्यासारख्या मदतीचा समावेश आहे. रशियाला थांबविण्यासाठी युक्रेनला तोफ गोळ्यांची तातडीने गरज आहे. ‘युक्रेनला आपले स्वातंत्र्य जपण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची तातडीने गरज आहे. घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत आणि आपल्याकडे अतिशय  थोडा वेळ शिल्लक आहे. सगळे जग कॉंग्रेसच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहे,’ असे आवाहन सुविल्लन यांनी या प्रसंगी कॉंग्रेसला केले.

युक्रेनच्या मदतीसाठी बायडेन प्रशासनाने ६० अब्ज डॉलरच्या मदतीचा प्रस्ताव अमेरिकी कॉंग्रेससमोर ठेवला आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या कॉंग्रेसमध्ये दोन्ही पक्षांच्या राजकीय भूमिकांमुळे हा प्रस्ताव अडकून पडला आहे. युक्रेनला मदत देण्यापूर्वी बायडेन प्रशासनाने अमेरिकेच्या सीमासुरक्षा व सीमा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे, असे रिपब्लिकन पक्षाचे म्हणणे आहे. तर, युक्रेनला मदत देण्याचा आणि अमेरिकेची सीमासुरक्षा हे दोन्ही स्वतंत्र विषय आहेत, अशी डेमोक्रॅटिक पक्षाची भूमिका आहे, त्या मुळे मदतीच्या मूळ प्रस्तावाचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. स्वतः बायडेन यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत कॉंग्रेसला सातत्याने विनंती केली आहे. इतकेच नव्हे, तर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की व जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनीही कॉंग्रेसकडे मदतीबाबत विनंती केली होती. मात्र, तरीही कॉंग्रेसने हा प्रस्ताव मतदानासाठी घेतलेला नाही.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय ‘पेंटॅगॉन’नेही या विषयी नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली शस्त्रव्यवस्थापन व युक्रेनला देण्यासाठी लागणारी शस्त्रे यासाठी आपल्यला सुमारे १० अब्ज डॉलरची गरज आहे, असे ‘पेंटॅगॉन’ने म्हटले आहे.

विनय चाटी  


Spread the love
Previous articleTejas Crashes Minutes After Taking Part In Bharat Shakti Exercise
Next articleअग्नी-5 क्षेपणास्त्रामध्ये ‘मिसाईल वुमन’ शीना राणी यांचे लक्षणीय योगदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here