द्विपक्षीय लष्करी सहकार्याबाबत संरक्षणमंत्र्यांशी चर्चा
दि. १७ एप्रिल: लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बुधवारी उझबेकिस्तानच्या लष्करी अकादमीला भेट देऊन तेथील माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्यांनी उझबेकिस्तानच्या संरक्षणमंत्री व हवाईदल प्रमुखांची भेट घेऊन द्विपक्षीय लष्करी सहकार्याबाबत चर्चा केली, अशी माहिती लष्कराच्या माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी (एडीजी-पीआय) दिली आहे.
भारत आणि उझबेकिस्तानच्या लष्करांमध्ये वार्षिक द्विपक्षीय लष्करी सराव ‘दस्तलिक-२०२४’ ला सुरुवात झाली आहे. त्यासाठी भारतीय लष्कराची ४५ जवानांची तुकडी उझबेकिस्तानला रवाना झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि उझबेकिस्तानच्या द्विपक्षीय लष्करी सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे सध्या उजबेगीस्तांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी जनरल पांडे यांनी उझबेकिस्तानच्या लष्करी अकादमीला भेट देऊन तेथील माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. ही प्रयोगशाळा भारताच्या सहकार्याने उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर या अकादमीचे प्रमुख अरिफ सईद यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. या प्रसंगी लष्करी अकादमीतील विद्यार्थी व अधिकाऱ्यांना जनरल पांडे यांनी संबोधित केले.
संरक्षणमंत्र्यांशी चर्चा
जनरल पांडे यांनी ताश्कंद येथे उझबेकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्त्वाची भेट घेतली. संरक्षण राज्यमंत्री व लष्करप्रमुख मेजर जनरल खालमुकामेदोव सुखरात गाय्रात्जानोवीच, दुसरे राज्यमंत्री व हवाईदल प्रमुख मेजर जनरल बुर्खानोव अहमेद जमालोवीच यांच्याशी त्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेली ही चर्चा द्विपक्षीय दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर जनरल पांडे उझबेकिस्तानच्या लष्करी संग्रहालयालाही भेट दिली. जाणार पांडे यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला भेट देऊन तेथे श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, व्हिक्टरी पार्क, सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीला भेट दिली.
विनय चाटी