२५ वर्षांतील सर्वात मोठा भूकंप: रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रता
दि. ०३ एप्रिल: तैवानला बुधवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर ७.४ इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली असून, तैवानच्या आग्नेयेला असलेल्या हुआलीन या शहरात जमिनीखाली ३१ किमीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे भूगर्भ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या पाव शतकात तैवानला बसलेला हा सर्वांत मोठा भूकंपाचा धक्का असून, या मुळे या परिसरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेत चार जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.
तैवानला बसलेल्या या धक्य्यामुळे केंद्रबिंदू असलेल्या हुआलीन या शहरात इमारतींची मोठ्याप्रमाणात पडझड झाली आहे. या भागात भूकंपाच्या मोठ्या धक्क्यानंतर अनेक छोटे धक्केही जाणविले. त्यापैकी एक धक्का ६.५ रिश्टर स्केल क्षमतेचा होता, असे अमेरिकी भूगर्भविज्ञान संस्थेने म्हटले आहे. सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये या भूकंपामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. भुयारी रेल्वे आणि भुयारी मार्गही बंद करण्यात आले आहेत. शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. पूर्व किनारपट्टीवरील डोंगराळ भागात या भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. भूकंपामुळे दरडी कोसळल्याने त्याचा राडारोडा रस्त्यांवर येऊन रस्ते बंद झाले आहेत. काही रस्त्यांना मोठे तडे गेल्याचेही निदर्शनास आले. राजधानी तैपईमध्येही भुयारी रेल्वे बंद करण्यात आली आहे. तैवानच्या संसदेच्या इमारतीलाही तडे गेले आहेत. दुसऱ्या महायुद्धकालीन एका शाळेच्या इमारतीचे रुपांतर तैवानच्या संसद सभागृहाच्या इमारतीत करण्यात आले होते.
तैवानला नजीकच्या भूतकाळातील सर्वांत मोठा भूकंपाचा धक्का २१ सप्टेंबर १९९९मध्ये बसला होता. त्याची तीव्रता ७.७ इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपात सुमारे २४०० नागरिकांचा बळी गेला होता, तर एक लाखापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. हुआलीनला २०१८मध्येही भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. या धक्क्यात येथील बऱ्याच ऐतिहासिक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. तैवानमधील या भूकंपाचा धक्का चीनमध्येही शांघाय व इतर शहरांतही जाणवला. चीन तैवानपासून सुमारे १६० किलोमीटर अंतरावर आहे. जपानलाही भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीचा अंदाज घेण्यासाठी हवाईदलाकडून टेहेळणी सुरु केली आहे. ओकिनावा भागाला या त्सुनामीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
(एपी ‘इनपुट्स’सह)