‘बीआरओ’ची माहिती: सामरिक महत्त्व, मनाली-लेह अंतर कमी होणार
दि. २७ मार्च: भारताच्या अतिउत्तरेकडील पूर्व लडाखला देशाच्या मुख्यभूमीशी जोडण्यासाठी अतिशय कळीच्या समजल्या जाणाऱ्या निमू-पदम-दारचा या सुमारे २९८ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, तो वापरण्यायोग्य झाल्याची माहिती सीमा सडक संघटनेकडून (बीआरओ) बुधवारी देण्यात आली. हिमाचल प्रदेशातील मानली ते लडाखमधील लेह या शहराला जोडणारा हा रस्ता आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘बीआरओ’ने या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे.
भारताच्या उत्तरेकडे असलेल्या लडाख व सियाचीन येथे सैन्य व रसद तातडीने पाठवण्यासाठी बारा महिने वापरण्यायोग्य रस्ता असणे अतिशय गरजेचे होते. सध्या मनाली-लेह व श्रीनगर-लेह हे दोन महामार्ग यासाठी वापरण्यात येतात. मात्र, हिवाळ्यात हिमावृष्टीमुळे किमान सहा महिने हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद असतात. हा कालावधी आता कमी झाला असला तरी, भारताच्या अतिउत्तरेकडे सीमा रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना रसद पुरवणे जिकरीचे जात होते. त्याचबरोबर या भागातील नागरिकांचाही देशाच्या मुख्यभूमीशी असलेला संपर्क तुटत असे. त्यामुळे सर्व ऋतूत सुरू राहील असा रस्ता असणे गरजेचे होते. त्या दृष्टीने ‘बीआरओ’कडून या रस्त्याचे कामकाज सुरू होते. या रस्त्यामुळे मनालीवरून लेहला जाण्यासाठी अतिशय जवळचा आणि तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच, या रस्त्यामुळे या संपूर्ण भागाचा देशाच्या इतर भागाशी असलेला संपर्क वाढेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
‘हिवाळ्यात झंस्कार नदीचे पात्र गोठल्यानंतर या भागात मजूर आणि अवजड यंत्रे आणून ‘बीआरओ’ने हे काम सुरु केले व त्याला गती दिली. रस्ता बांधणीचे काम आता पूर्ण झाले आहे. तो वापरण्यायोग्य करण्यात आला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरु असून, लवकरच ते पूर्ण होईल व हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल,’ असे ‘बीआरओ’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी सांगितले. निमू-पदम-दारचा हा रस्ता सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. इतर दोन रस्त्यांच्या तुलनेत हा लेहला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावरून जाताना सोळा हजार ५५८ फुटांवर असलेली शिंकून ला ही एकच खिंड पार करावी लागते. या खिंडीखालील बोगद्याचे काम एकदा पूर्ण झाले, की या भागाला बारा महिने देशाच्या इतर भागाला जोडता येणार आहे. शिंकून ला खिंडीखाली बोगदा बांधण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये एक हजार ६८१ कोटी रुपये मंजूर केले होते. हा प्रस्तावित बोगदा सुमारे ४.१ किलोमीटर अंतराचा असून, या बोगद्यातून दुहेरी वाहतूक करता येणार आहे.
विनय चाटी