नौदलाच्या ‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’ कवायतीला सुरुवात

0
‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’या नौदल कवायतीदरम्यान भारत , मोझांबिक व टांझानियाचे नौदल अधिकारी छायाचित्र: पीआयबी

भारत, मोझांबिक व टांझानियाचा समावेश

दि. २२ मार्च: सागरी सहकार्य व सुरक्षेबाबत भारत, मोझांबिक आणि टांझानिया यांच्यादरम्यानच्या ‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’ त्रिपक्षीय नौदल कवायतीला गुरुवारपासून सुरुवात झाली. भारताच्या ‘आयएनएस तीर’ व ‘आयएनएस सुजाता’ या दोन युद्धनौका या कवायतीत सहभागी होणार आहेत. मोझांबिकमधील नाकाला या नौदलतळावर २९ मार्च रोजी या कवयातींची सांगता होणार आहे. आफ्रिकी देशांबरोबरचे नौदल सहकार्य वाढविण्यासाठी या त्रिपक्षीय कवायतीला २०२२मध्ये सुरुवात झाली होती. भारताच्या ‘आयएनएस तर्कश’ या युद्धनौकेने या कवायतीत सहभाग नोंदविला होता.

‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’च्या या वेळच्या कवायतींचे दोन सत्रांत नियोजन करण्यात आले आहे. पहिले किनारपट्टी आणि बंदराला भेट देण्याचे सत्र २१-२४ मार्च दरम्यान होणार आहे. या काळात भारताच्या ‘आयएनएस तीर’ व ‘आयएनएस सुजाता’ या दोन युद्धनौका टांझानियामधील झांझिबार व मोझांबिकमधील मापुतो या बंदरांना भेट देणार आहेत. या सत्राची सुरुवात नौदल नियोजन विषयक परिषदेने होणार आहे. त्याचबरोबर आपत्ती व हानी नियंत्रण, अग्निशमन, जहाजावर ताबा मिळवून शोधकार्य राबविणे, वैद्यकीय मार्गदर्शन, आपत्कालीन स्थलांतर, पाणबुडी प्रात्याक्षिके पहिल्या टप्प्यात करण्यात येतील. कवायतीचा दुसरा सागरी टप्पा २४ ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. या टप्प्यात अपारंपरिक युद्धाचे प्रकार व त्याचे प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष जहाज हाताळणी, शोध व ताबा घेणे व सागरातील विशेष आर्थिक क्षेत्राचे सर्वेक्षण अशी प्रात्याक्षिके होणार आहेत. मोझांबिकमधील नाकाला नौदलतळावर तीनही नौदलातील सहभागी नौसैनिक व अधिकाऱ्यांचे संयुक्त सत्र होऊन, २९ मार्च रोजी या कवयातींची सांगता होईल.

या कवायतीदरम्यान ‘आयएनएस तीर’ व ‘आयएनएस सुजाता’ या युद्धनौका भेटीसाठी खुल्या ठेवण्यात येणार आहेत. तीनही सहभागी देशांच्या नौसैनिक व अधिकाऱ्यांसाठी या कालावधीत क्रीडास्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. नौदलाच्या १०६ एकात्मिक अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थी या काळात या बंदरांना भेट देणार आहेत, या भेटीचे नियोजनही करण्यात आले आहे.

विनय चाटी  

स्त्रोत: पत्र सूचना कार्यालय (पीआयबी)

+ posts
Previous articleजेट इंजिनच्या चाचणीसाठी ‘जीआरटीई’ची मदतीची मागणी
Next articleभारताकडून चीन सीमेवर ‘ड्रोण’विरोधी यंत्रणा तैनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here