बायडेन यांची घोषणा: अमेरिकी केंद्र सरकार करणार आर्थिक मदत
दि. २७ मार्च: व्यापारी मालवाहू जहाजाच्या धडकेत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला बाल्टीमोर येथील ‘फ्रान्सिस स्कॉट के ब्रिज’ या पुलाच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च अमेरिकी केंद्र सरकार करणार असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे.काल, मंगळवारी एका मालवाहू व्यापारी जहाजाच्या धडकेमुळे हा पूल कोसळला होता.
‘बाल्टीमोर येथील दुर्घटनेत कोसळलेला हा पूल पूर्णपणे केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून बांधला जावा, अशी माझी इच्छा आहे. या कामात काँग्रेस मला पूर्ण सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे,’ असे बायडेन म्हणाले. ‘ या घटनेत बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या आप्तेष्टांना प्रत्येक क्षण हा एका युगासारखा वाटत असेल, याची मला कल्पना आहे,’ असेही बायडेन यांनी म्हटले आहे. मंगळवारी दाली नावाच्या सुमारे तीनशे मीटर लांब व ४६ मीटर रुंदी असलेल्या महाकाय मालवाहू जहाजाने बाल्टीमोर येथील पाताप्स्को नदीवरील प्रसिद्ध ‘फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज’ला धडक दिली होती. या धडकेत हा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. या घटनेत पुलावरून जाणाऱ्या काही मोटारी व पुलावर असलेले वीस नागरिक नदीपात्रात कोसळले. पूल कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे जहाज बाल्टिमोरवरून श्रीलंकेतील कोलंबोकडे निघाले होते. जहाजावर सिंगापूरचा राष्ट्रध्वज होता. हे जहाज ग्रेस ओशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे होते,’ अशी माहिती ‘मरीन ट्राफिक’ कडून मिळाली आहे.
नदीतून प्रवास करताना हे जहाज पुलाच्या एका खांबाला धडकले. ही टक्कर झाली त्यावेळेस एक किवा अधिक चालकांच्या हातात जहाजाचा ताबा होता. बंदरात येण्यासाठी अथवा बाहेर जाण्यासाठी मदत करणाऱ्या स्थानिक लोकांचीच यासाठी मदत घेण्यात आली होती. या धडकेमुळे घटनास्थळावरील सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला आणि अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील या महत्त्वाच्या बंदराकडे जाणण्याचा मार्ग बंद पडला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क व वॉशिंग्टन या दोन शहरांना जोडण्यासाठी हा पूल महत्त्वाच्या होता. यामुळे बाल्टिमोरला टाळून जाता येत होते. या पुलावरून दररोज सुमारे ३१ हजार मोटारी प्रवास करीत होत्या. सुदैवाने बाल्टिमोर आंतरराष्ट्रीय मालवाहू मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मालवाहतुकीवर या दुर्घटनेचा फारसा परिणाम होणार नाही, असे या विषयातील तज्ज्ञ जुडाह लेवीन यांनी सांगितले.
विनय चाटी