स्टेल्थ विमान प्रकल्प: पाचव्या पिढीची विमाने भारताला विकण्याचा मार्ग बंद?
दि. १५ मार्च: ‘ॲडव्हान्स मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (ॲमका) हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान देशांतर्गत विकसित व उत्पादित करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे आपली नवी पाचव्या पिढीची सुखोई-५७ व सुखोई-७५ विमाने भारताला विकण्याचा रशियाचा मार्ग बंद झाला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने नुकतीच ‘ॲडव्हान्स मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (ॲमका) या प्रकल्पांतर्गत पाचव्या पिढीची स्टेल्थ विमाने देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित व उत्पादित करण्यास मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १.८ अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. शत्रूच्या हवाई टेहेळणीला (रडार) चकवा देण्याची व दृष्टिपथात न येण्याची क्षमता असलेल्या या विमानांमुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. अमेरिका, रशिया, चीन व तुर्कीए या देशांनीच आत्तापर्यंत स्टेल्थ विमानाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या विमानाच्या आरेखन आणि संशोधन व विकास प्रक्रियेत संरक्षण संशोधन व विकास संस्थेची (डीआरडीओ) ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ (एडीए) ही हवाई तंत्रज्ञान विषयक संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तर, ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) व इतर खाजगी कंपन्या या विमानाच्या उत्पादनाची जबाबदारी उचलतील.
सोविएत काळापासून भारत रशियन शस्त्रांचा मोठा खरेदीदार देश म्हणून ओळखला जातो. दोन्ही देशांच्या उभयपक्षी संबंधात शस्त्रखरेदी हा मोठा दुवा आहे. भारताने या पूर्वी मिगपासून सुखोईपर्यंतची लढाऊ विमाने रशियाकडून खरेदी केली आहेत. त्यांचे तंत्रज्ञान हस्तांतरही या करारानुसार झाले आहे. मात्र, भारताने ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या दोन योजनांच्या माध्यमातून लष्करीदलांना आवश्यक असणारी शस्त्रे देशांतर्गत विकसित व उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही काळापासून ही समीकरणे बदलत असल्याचे दिसत आहे. रशियाने त्यांची पाचव्या पिढीची आणि स्टेल्थ तंत्रज्ञान असलेली सुखोई-५७ व सुखोई-७५ ही लढाऊ विमाने नुकतीच प्रदर्शित केली. भारत हाच त्यांच्या दृष्टीने या विमानांचा मुख्य खरेदीदार होता. मात्र, ‘ॲमका’ प्रकल्पामुळे ही विमाने भारताला विकण्याचा रशियाचा मार्ग बंद झाल्याचे मानले जात आहे.
‘ॲमका’ प्रकल्पामुळे भारत लष्करी विमान निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. स्वतःच्या क्षमता वाढवितानाच परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्नही भारत करीत आहे. ‘ॲमका’ अंतर्गत बनविण्यात येणारी विमाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात येणार असल्यामुळे भारताच्या हवाईदलाच्या सातत्याने विकसित होणाऱ्या गरजा भागविता येणे शक्य होणार आहे. स्वतःची सुरक्षा व सार्वोभौमत्त्व राखण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण सहकार्य करण्यासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणूनही भारताची ओळख निर्माण होणार आहे.
विनय चाटी
स्त्रोत: वृत्तसंस्था