पायभूत सुविधा आणि प्रशिक्षण पद्धतीचा घेतला आढावा
दि. ०२ मे: भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गुरुवारी पुण्यातील लष्करी गुप्तचर प्रशिक्षण संस्था आणि केद्र व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण पद्धतीचा आढावा घेतला, अशी माहिती लष्करच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांच्यावतीने (एडीजी-पीआय) ‘एक्स’ या ‘मायक्रो ब्लॉगिंग’ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
लेफ्टनंट जनरल द्विवेदी लष्करी आणि सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या केंद्रांना भेट देत आहेत. त्याचबरोबर लष्करी सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील उपक्रम व राष्ट्रीय महत्त्वाच्या शिक्षणसंस्थानही त्यांनी भेट दिली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी कानपूरचा दौरा करून तेथील महत्त्वाच्या लष्करी आस्थापनांना भेट दिली होती. त्याच मालिकेत त्याचा पुणे दौरा आयोजित करण्यात आला होता.
जनरल द्विवेदी यांनी पुण्यातील ‘मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो’ला (एमआयएनटीएसडी) भेट दिली. तेथे त्यांना गुप्तचर प्रशिक्षण संस्थेत असलेल्या विविध सुविधा आणि अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यात आली. तसेच, येथील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आयोजित विविध उपक्रमांची माहितीही त्यांना देण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि जवानांची क्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचे प्रात्यक्षिकही जनरल द्विवेदी यांना दाखविण्यात आले. ‘भारतीय लष्कर सध्या फेरबदलाच्या प्रक्रियेतून जात आहे. अत्याधुनिक, चपळ, तंत्रस्नेही व युद्धसज्ज लष्कर उभारण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. त्याचदृष्टीने हे वर्ष भारतीय लष्कराकडून तंत्रज्ञान समावेशन वर्ष म्हणून साजरे केले जात आहे,’ असे जनरल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.
‘एनडीए’ला भेट
आपल्या दौऱ्यात लष्कर उपप्रमुखांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीलाही (एनडीए) भेट दिली. ‘एनडीए’चे समादेशक (कमांडंट) व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांना ‘एनडीए’त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच, संस्थेच्या अभ्यासक्रमातील प्रस्तावित बदल व त्यांचे समायोजन या बद्दलही त्यांनी माहिती घेतली. जनरल द्विवेदी यांनी या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
विनय चाटी