दि. ०८ एप्रिल: देशाच्या एकूण संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राचा टक्का वाढल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षण उत्पादन विभागाने दिली आहे. मार्च २०२४ मध्ये संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षांत देशातील एकूण संरक्षण उत्पादन ७४ हजार ७३९ कोटी इतके होते. त्यात खासगी क्षेत्राचा वाटा २२ टक्के म्हणजे १६ हजार ४११ कोटी इतका होता, असे संरक्षण उत्पादन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. गेल्या आठ वर्षांतील (२०१६-१७ पासून) ही सार्वाधिक वाढ आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत एकूण देशांतर्गत संरक्षण उत्पादन सुमारे एक लाख कोटी होते. त्यामध्ये खासगी क्षेत्राचा वाटा १९ टक्के म्हणजे सुमारे २१ हजार ८३ कोटी होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा संरक्षण उत्पादन ७४ हजार ७३९ कोटी झाले असून, खासगी क्षेत्राचा वाटा १६ हजार ४११ कोटी म्हणजे २२ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण देशांतर्गत संरक्षण उत्पादनात घात झाली असल्याने ही टक्केवारी वाढल्याची दिसत आहे.
देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकारकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. देशाच्या संरक्षण साहित्याच्या खरेदीपैकी ७५ टक्के खरेदी देशांतर्गत उद्योगाकडून करण्यात येईल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी नुकतेच जाहीर केले आहे. ही रक्कम जवळपास शंभर अब्ज इतकी आहे. त्याचबरोबर परकी कंपन्यांकडून खरेदी करताना त्यांना त्याच्या नफ्यातील काही भाग देशांतर्गत संरक्षण साहित्याची उत्पादनासाठी गुंतविण्याची अटही घालण्यात आली आहे.
विक्रमी निर्यात
संरक्षण साहित्याच्या निर्यातीसाठी सरकारी तसेच खासगी उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून या वर्षी संरक्षण साहित्याची निर्यात एकूण २१ हजार ८३ कोटी इतकी झाली. गेल्या आर्थिक वर्षांत ती १५ हजार ९२० कोटी इतकी होती. तर ऑफसेटच्या माध्यमातून ७.९ अब्ज गुंतवणूक झाली. ही २०१९-२० मधील सुमारे दोन अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीच्या तिप्पट आहे. त्याचबरोबर सरकारने विशेष संरक्षण क्षेत्रातही (डिफेन्स कोरिडोर) गुंतवणूक वाढविली आहे. उत्तरप्रदेश व तामिळनाडू येथील ‘डिफेन्स कोरिडोर’ सरकारने अनुक्रमे सुमारे २५ हजार ३९७ कोटी व ११ हजार ८२१ कोटी इतकी गुंतवणूक केली आहे.
विनय चाटी
स्रोत: वृत्तसंस्था