‘प्रोजेक्ट मेघसुचक-१०’: नौदलाची कार्यक्षमता वाढणार
दि. १६ एप्रिल: ढगांच्या आच्छादनाची उंची आणि जाडी मोजण्यासाठी उपयुक्त असणारे लीडर-सिलोमीटर (एलआयडीईआर-सिलोमिटर) हे उपकरण नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे नौदलाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. हे अत्याधुनिक उपकरण डेहराडून येतील ‘इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ (आयआरडीई) या संस्थेने देशांतर्गत विकसित केले आहे. ‘प्रोजेक्ट मेघसुचक-१०’ अंतर्गत या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.
समुद्रातून प्रवास करताना नौदलच्या जहाजांना विस्तृत दृश्यमानता असणे अतिशय गरजेचे असते. त्यातही प्रामुख्याने नौदलच्या हवाई सेवेसाठी (नेव्हल एव्हिएशन) हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपकरणामुळे दहा किलोमीटरच्या परिसरातील ढगांचे आच्छादन व त्याची जाडी मोजता येणार आहे. त्यामुळे वैमानिकांच्या दृश्यमानतेत वाढ होऊन त्याची कार्यक्षमता वाढणार आहे. दृश्यमानता कमी असल्यामुळे होणारे अपघातही या उपकरणामुळे टाळता येणार आहेत. हे अत्याधुनिक उपकरण ‘गिंबल’वर बसविण्यात आले आहे. त्यामुळे नौदलाला अधिक परिणामकारकरित्या ढगांचे आच्छादन, त्याची उंची व जाडीचा अभ्यास करता येणार आहे.
वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी आणि ढगांची जाडी, उंची मोजण्यासाठी बनविण्यात आलेले हे उपकरण स्वदेशी संशोधन आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. या अत्याधुनिक संवेदकामुळे नौदलाच्या युद्धसज्जतेत आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे, असे ‘इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’चे (आयआरडीई) संचालक डॉ. अजयकुमार यांनी सांगितले. स्वदेशी निर्मित या उपकरणामुळे देशाची संशोधन क्षमता आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद जगापुढे आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आत्मनिर्भर भारत’चे हे यश असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
विनय चाटी
स्रोत: वृत्तसंस्था