‘एएमसीए’ प्रकल्पावर भारताबरोबर काम करण्यास इच्छुक

0
अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमानाच्या (ॲडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट-एएमसीए) ‘प्रोटोटाईप’चे संग्रहित छायाचित्र.
अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमानाच्या (ॲडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट-एएमसीए) ‘प्रोटोटाईप’चे संग्रहित छायाचित्र.

‘लॉकहिड मार्टिन’चे प्रतिपादन: तंत्रज्ञान हस्तांतर करण्याची तयारी

दि. १९ एप्रिल: भारताच्या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान (ॲडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट-एएमसीए)  या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या प्रकल्पावर भारताबरोबर काम करण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन संरक्षण सामग्री व विमान उत्पादन क्षेत्रातील अमेरिकी कंपनी ‘लॉकहिड मार्टिन’चे जागतिक व्यवसाय उपाध्यक्ष रँडी हॉवर्ड यांनी केली आहे. अत्याधुनिक विमानाच्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञान हस्तांतर करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

‘लॉकहिड मार्टिन’ ही अमेरिकी कंपनी संरक्षण सामग्री व विमानांच्या उत्पादन क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था मानली जाते. या कंपनीने अनेक महत्त्वाच्या लढाऊ विमानांची निर्मिती केली आहे. त्यामुळे या कंपनीने भारताच्या विमान निर्मिती क्षेत्रात सहकार्य करण्यास रस दर्शविल्यामुळे देशांतर्गत विमान निर्मिती तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘लॉकहिड मार्टिन’चे जागतिक व्यवसाय उपाध्यक्ष रँडी हॉवर्ड यांनी नुकतीच या क्षेत्रात भारताबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर भारतीय भागीदारांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतर करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

भारताने ७०च्या दशकांत देशांतर्गत विमाननिर्मिती करण्यास सुरुवात केली होती. तेव्हांपासून स्वदेशी तंत्रज्ञानाचे संशोधन व विकासकार्यात भारताने मोठी मजल मारली आहे. तेजससारखे हलके लढाऊ विमान आणि ध्रुवसारखे हेलिकॉप्टर देशांतर्गत विकसित करून भारताने या क्षेत्रातील आपली क्षमता दाखवून दिली आहे. विशेषतः ही सर्व उत्पादने अतिशय स्वस्तात तयर करण्यात आली आहेत. तर, एफ-३५ व एफ-२२ सारखी अत्याधुनिक विमाने उत्पादित करून ‘लॉकहिड मार्टिन’नेही आपली क्षमता सिद्ध केली आहे. दक्षिण कोरियाच्या केएफ-२१ या लढाऊ विमानाच्या प्रकल्पातही ‘लॉकहिड मार्टिन’ सहकार्य करीत आहे. आता भारताच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान (ॲडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट-एएमसीए)  या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या प्रकल्पावर भारताबरोबर काम करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली आहे.

भारताबरोबरच्या प्रस्तावित सहकार्यात ‘ऑटो ग्राउंड कोलीजन अवॉइडन्स सिस्टीम’ (ऑटो-जीसीएएस) सारख्या अत्याधुनिक व जीवरक्षक प्रणालीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधीत बाबींचा समावेश आहे. ‘ऑटो-जीसीएएस’ प्रणालीमुळे उड्डाण घेताना अथवा उतरताना विमानाची जमिनीशी होणारी टक्कर टाळता येते. तसेच, भारताकडून खरेदी करण्यात येणाऱ्या एफ-२१ या विमानाच्या ‘कॉकपीट’च्या आरेखन व विकास प्रकल्पात सहकार्य करण्याची तयारीही ‘लॉकहिड-मार्टिन’ने दर्शविली आहे. ‘टाटा एरोस्पेस’बरोबर हा प्रकल्प सुरु आहे. त्यात विमानाच्या पंखांच्या विकासाच्या कार्यक्रमाचाही अंतर्भाव आहे.

विनय चाटी

(एजन्सी ‘इनपुट्स’सह)


Spread the love
Previous article‘आयआयटी’ करणार जवानांच्या आरोग्यविषयक समस्यांवर संशोधन
Next articleIndia Delivers First Batch Of Brahmos Missile Systems To Philippines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here