‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’मध्ये आत्मनिर्भर भारताचे दर्शन

0

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ या प्रदर्शनात आत्मनिर्भर भारत व ‘मेक इन इंडिया’च्या ‘सक्सेस स्टोरी’चे दर्शन प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी, नागरिकांना घडत आहे. या प्रदर्शनात ‘एमएसमएई’ची ४१८ लहान आणि ३३ मोठी दालने आहेत. भारतीय लष्कराच्या तीन्ही दलांनी प्रदर्शनात सहभाग घेतला असून अत्याधुनिक संरक्षण सामुग्री प्रदर्शित केली आहे.

आत्मनिर्भर भारताचे दर्शन

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन संस्था (डीपीएसयु) आणि खासगी क्षेत्रातील संरक्षण साहित्य निर्मात्या कंपन्या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून त्यांनी प्रदर्शित केलेल्या उत्पादनांद्वारे संरक्षण क्षेत्रात देशाने ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने केलेल्या प्रगतीचे दर्शन होत आहे. भारताने सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांद्वारे सशस्त्र दलांच्या गरजा, संशोधन आणि विकास आणि संरक्षण उत्पादन याची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेले आकाश आणि समर क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-IV आणि लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, बोफोर्स गन, वज्र टॅंक, भिष्म टँक, इन्फँन्ट्री कॉम्बॅट व्हेईकल, धनुष, एलएसव्ही, रुद्र, समर-२, जमीनीवरून हवेत मारा करणारे प्रक्षेपास्त्र, पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली, अँटी सबमरिन क्षेपणास्त्रे, विविध युद्धनौका, पाणबुड्यांच्या प्रतिकृती अशी प्रगत आयुधे खास आकर्षण ठरत आहे. या आुयधांसोबत सेल्फी घेण्याचा आनंदही नागरिक घेत आहेत.

संशोधनातील प्रगतीची यशोगाथा

डीआरडीओने आपले प्रगत तंत्रज्ञान येथे प्रदर्शित केले आहे. त्यात पिनाका रॉकेट सिस्टीम, अभ्यास रॉकेट लाँचींग सिस्टीमचा समावेश आहे. दक्ष डिफ्युजरसारखे उन्नत रोबोटीक्स तंत्रज्ञानही येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. खाजगी संस्थांनीदेखील विविध तंत्रज्ञानांनी सज्ज वाहने, टँक, शस्त्रास्त्रे येथे प्रदर्शित केलेली आहेत. भारतीय वायुदलाने ‘नाविन्यतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना स्पष्ट करणारी विविध उत्पादने येथे प्रदर्शित केली आहेत.

विनय चाटी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here