भारतीय बनावटीच्या विमानांचा संरक्षणदलांसाठी वापर
दि. २१ मार्च: भारतीय बनावटीची विविध शस्त्रे आणि शश्त्रास्त्रप्रणाली जागतिक निकषांवर सिद्ध होत असून, कॅरिबियन समुद्रात दक्षिणेला वसलेल्या गयानानेही आता भारतीय बनावटीची डॉर्नियर विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमाने गयानाच्या संरक्षणदलांसाठी वापरण्यात येणार आहेत. उभय देशांदरम्यानच्या या करारावर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले.
गयानाच्या संरक्षणदलांसाठी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) उत्पादित केलेली दोन डॉर्नियर-२२८ ही विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. भारताकडून ‘लाईन ऑफ क्रेडिट’च्या (एलओसी) माध्यमातून मिळालेल्या २३.२७ दशलक्ष डॉलरच्या कर्जाच्या माध्यमातून ही विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. याबाबत गयानाचे सरकार आणि भारताची ‘एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया’ (एक्स्झीम बँक) यांच्यादरम्यान १५ मार्च रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारत आणि गयाना यांच्यात आत्तापर्यंत असे ११ करार झाले आहेत. त्याचबरोबर भारताने आत्तापर्यंत जगभरात २९२ ‘लाईन ऑफ क्रेडिट’च्या माध्यमातून सुमारे २. ७२ अब्ज अमेरिकी डॉलरची कर्जे वितरीत केली आहेत.
गयाना हा कॅरेबियन समुद्रात व्हेनेझुएलाच्या शेजारी बसलेला छोटा देश आहे. त्यामुळे आपल्या समुद्री सीमांच्या रक्षणासाठी व टेहळणीसाठी त्याला उपयुक्त अशा विमानांची गरज होती. त्याचबरोबर या भागात सैन्य आणि रसद पोचवण्यासाठीही गयानाला या विमानांचा उपयोग करता येणार आहे. पूर्वी भारत आपल्या ‘इंडियन टेक्निकल अँड इकॉनोमिक को-ऑपरेशन,’ या कार्यक्रमांतर्गत गयानाला छोट्या स्वरूपाची लष्करी सामग्री पुरवीत असे. मात्र, गयानाची सागरी सुरक्षा व गस्तीसाठी आवश्यक असणारी गरज लक्षात घेऊन प्रथमच उभय देशांदरम्यान मोठ्या सामग्रीबाबत करार करण्यात आला आहे. गयानाचे अर्थमंत्री डॉ. अशनी के. सिंग व एक्स्झीम बँकेच्या उपसरव्यवस्थापकांनी या करारावर स्वाक्षरी केली. या मुळे गयानाला आपल्या हवाईदलाची व तटरक्षक दलाची गरज भागविता येणार आहे. ‘भारताकडून ‘लाईन ऑफ क्रेडिट’च्या माध्यमातून घेण्यात येणारी ही विमाने गयानाच्या संरक्षणदलाच्या क्षमतावृद्धीच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांनी जानेवारी २०२३ मध्ये ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ला भेट दिली होती. या भेटीदरम्यान उभय देशांमध्ये ‘लाईन ऑफ क्रेडिट’ बाबत करार करण्यात आला होता. त्यानुसार ‘एचएएल’च्या कानपूर येथील प्रकल्पात उत्पादित केलेली दोन डॉर्नियर-२२८ विमाने खरेदी करण्यास त्यांनी मान्यता दिली होती,’ असे गयानाचे डॉ. सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गयानाच्या संरक्षण दलप्रमुखांनीही या विमानांमुळे संरक्षणदलांची क्षमता वाढणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
डॉर्नियर हे दोन इंजिने असलेले बहुपयोगी विमान आहे. सागरी टेहळणीसाठी याचा उपयोग होतो. ‘एचएएल’ने प्रामुख्याने भारतीय तटरक्षक दलासाठी या विमानांची निर्मिती केली होती. हलक्या वजनामुळे या विमानाला इंधनही कमी लागते. सागरी टेहेळणी, गस्त, सागरी प्रदूषणाला आळा घालणे, मदत व बचाव कार्य अशा विविध कारणांसाठी तटरक्षक दलाकडून याचा वापर केला जातो. या पूर्वी भारताने मालदीव व श्रीलंकेला ही विमाने भेट दिली आहेत.
विनय चाटी