जेट इंजिनच्या चाचणीसाठी ‘जीआरटीई’ची मदतीची मागणी

0
कावेरी इंजिनाचे संग्रहित छायाचित्र.

हवाईदलाकडे ‘फ्लाईट टेस्टबेड’ म्हणून ‘आयएल-७६’ विमान देण्याची विनंती

दि. २२ मार्च: देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या सहायाने निर्मित करण्यात येत असलेल्या जेट इंजिनाच्या चाचणीसाठी ‘गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट,’ने  (जीआरटीई) हवाईदलाकडे सध्या त्यांच्या वापरात असलेल्या रशियन बनावटीच्या आयएल-७६ या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या विमानाची मागणी केली आहे.

भारताची संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) व त्याचीच एक शाखा असलेल्या ‘गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट,’ने  (जीआरटीई) स्वदेशी जेट इंजिनाच्या संशोधन व विकास प्रयत्नात मोठी मजल मारली आहे. सध्या ‘जीआरटीई’ दोन महत्त्वाच्या जेट इंजिन प्रकल्पांवर काम करीत आहे. स्वदेशी बनावटीच्या दूरनियंत्रकाद्वारे नियंत्रित करण्यात येणाऱ्या चालकविरहीत लढाऊ विमानासाठी कावेरी ड्राय इंजिन प्रकल्पावर ‘जीआरटीई’मध्ये काम सरू आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाकांक्षी म्हणवल्या जाणाऱ्या ‘ॲडव्हान्स मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (ॲमका) या पाचव्या पिढीच्या ‘स्टेल्थ’ विमानासाठी आवश्यक असलेल्या ११० किलोन्यूटन क्षमतेच्या इंजीन निर्मितीच्या प्रकल्पावरही येथे काम सुरु आहे.

इंजिनाच्या संशोधन व विकास प्रक्रियेत स्वतःकडे फ्लाईट टेस्टिंगची सुविधा नसल्यामुळे रशियन बनावटीच्या ‘आयएल-७६’ या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या विमानाची रशियाकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव ‘जीआरटीई’ने दिला होता. मात्र, हा प्रस्ताव उपयुक्त व शक्य नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर देशांतर्गत स्त्रोतांच्या माध्यमातून इंजिन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी हवाईदलाकडे सध्या वापरात असलेल्या याच स्वरूपाच्या (‘आयएल-७६’) विमानाचा फ्लाईट टेस्टसाठी वापर करू द्यावा, अशी विनंती ‘जीआरटई’कडून हवाईदलाकडे करण्यात आली आहे. याचा वापर ‘तेजस एमके-१ए’ या हलक्या लढाऊ विमानासाठी आवश्यक असणाऱ्या कावेरी इंजिनाच्या चाचणीसाठी, तसेच ‘ॲमका’च्या मार्क-२ साठी लागणाऱ्या ११० किलोन्यूटनच्या इंजिनाच्या निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. या मुळे या प्रकल्पाचा खर्चही आटोक्यात राहणार आहे.

हवाईदलाबरोबर सध्या बोलणी सुरु असली, तरी, ‘आयएल-७६’ विमानाच्या इंजिनात टेस्टिंगसाठी सुधारणा करणाऱ्या रशियाच्या ग्रोमोव फ्लाईट रिसर्च इन्स्टिट्यूटबरोबर काम करण्याचा ‘जीआरटीई’चा चांगला अनुभव आहे. मात्र, हवाईदलाबरोबर सहकार्य केल्यामुळे व सध्या वापरात असलेले विमान टेस्ट बेड म्हणून वापरण्यात येत असल्यामुळे ‘जीआरटीई’ला हा प्रकल्प वेगाने पुढे घेऊन जाता येणार आहे व जेट इंजिन संशोधन, विकास व उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.

विनय चाटी

स्त्रोत: वृत्तसंस्था


Spread the love
Previous articleरशिया युक्रेन युद्धाचा भारताला फटका; S 400 Defence Missilesची डिलिव्हरी लांबली
Next articleनौदलाच्या ‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’ कवायतीला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here