जैसलमेरच्या वाळवंटात ‘तेजस’ कोसळले

0
Tejas crash, LCA Tejas, Tejas MK-1A, Light Combat Aircraft, Bharat Shakti exercise, Pokhran, Jaisalmer, PM Modi, Indian Air Force
तेजसचे (एलसीए) संग्रहित छायाचित्र.

पहिलीच घटना: निर्यातीच्या प्रयत्नाला फटका बसण्याची शक्यता

दि. १३ मार्च: तिन्ही सैन्यदलांचा समावेश असलेल्या ‘भारतशक्ती’ या लष्करी कवायतीत सहभागी होऊन आपल्या तळावर परत आलेले तेजस हे हलके लढाऊ विमान मंगळवारी राजस्थानातील जैसलमेरच्या वाळवंटात कोसळल्याची माहिती हवाईदलाकडून देण्यात आली आहे. तेजस २००६मध्ये हवाईदलात समाविष्ट करण्यात आले आहे. या सात वर्षांच्या कालावधीतील ही पहिलीच घटना असल्याचे हवाईदलाने म्हटले आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाने देशांतर्गत निर्मित एका इंजिनाचा समावेश असलेले ‘तेजस’ हे हलके लढाऊ विमान संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. तर, ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ या संस्थेने ‘तेजस’चे उत्पादन केले आहे. राजस्थानातील पोखरण येथे सोमवारी  (११ मार्च) रोजी लष्कर हवाई दल आणि नौदल यांच्या संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. या कवायतीत देशांतर्गत निर्मित शस्त्रास्त्रे व शस्त्रप्रणालींच्या मारक क्षमतेचे प्रदर्शन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान व तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख या कसरतीच्या वेळी उपस्थित होते. या कसरतीत सहभागी होऊन ‘तेजस’ जैसलमेर येथील आपल्या तळावर परत आले होते. तळावरून नेहमीच्या सरावासाठी पुन्हा उड्डाण घेऊन हवेत भरारी घेत असताना विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचा संदेश वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाला दिला. त्यानंतर क्षणातच लोकवस्तीच्या भागात तेजस कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वैमानिकाने आपत्कालीन यंत्रणेच्या सहायाने विमानातून सुटका करून घेतली, असे हवाईदलाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही हवाईदलाने स्पष्ट केले आहे.

सध्या हवाईदलाकडे ‘तेजस एमके-१’ या ४० लढाऊ विमानांचा ताफा आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये हवाईदलाने अतिरिक्त ८३  विमानांची मागणी नोंदविली होती. त्याचबरोबर ९७ विमाने खरेदी करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने उत्पादित केलेले ‘तेजस’ हे हलके लढाऊ विमान भारताच्या संरक्षण क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. ‘तेजस’ची कार्यक्षमता पाहता त्याच्या निर्यातीचे प्रयत्नही सरकारकडून सुरू आहेत. अनेक देशांनी तेजसच्या खरेदीत रसही दाखविला आहे. मात्र, या घटनेमुळे निर्यातीच्या प्रयत्नांना फाटका बसण्याची शक्यता आहे.

विनय चाटी


Spread the love
Previous articleअग्नी-5 क्षेपणास्त्रामध्ये ‘मिसाईल वुमन’ शीना राणी यांचे लक्षणीय योगदान
Next articleCoast Guard Nabs Pakistani Boat With Rs 480 Crore Narcotics After Dramatic High Seas Chase

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here