२५ विमानांची क्षमतावृद्धी: दोन हजार ८९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
दि. १६ मार्च: नौदलाच्या सेवेत असलेल्या २५ डॉर्निअर विमानांच्या क्षमतावृद्धीसाठी (मिडलाइफ अपग्रेड) संरक्षण मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील लढाऊ विमान उत्पादन कंपनी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’बरोबर (एचएएल) करार केला आहे. या करारानुसार विमानाच्या क्षमतावृद्धीसाठी दोन हजार ८९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या करारानुसार डॉर्निअर विमानात अत्याधुनिक ‘एव्हीयोनिक्स’ यंत्रणा व ‘सेन्सर्स’ बसविण्यात येणार आहेत. येत्या साडेसह वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
‘डॉर्निअर विमानांच्या क्षमतावृद्धीसाठी संरक्षण मंत्रालयाने ‘एचएएल’शी दोन हजार ८९० कोटी रुपयांचा करार केला असून, या कराराअंतर्गत या विमानांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या क्षमताबुद्धीमुळे डॉर्निअर विमानांची कार्यक्षमता अधिक वाढणार आहे. त्याचबरोबर कारवाईत सहभागी होण्याच्या क्षमतेतही वाढ होणार आहे. नौदलाकडून ही विमाने प्रामुख्याने सागरी व किनारपट्टीवरील टेहेळणी, इलेक्ट्रॉनिक टेहेळणी, तसेच सागरी सुरक्षेबाबत इतर आवश्यक बाबींसाठी वापरण्यात येतात,’ असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. या क्षमतावृद्धीमुळे शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात या विमानाचा वापर करता येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.
‘एचएएल’कडून देशातच या विमानांची क्षमतावृद्धी करण्याचे काम होत असल्यामुळे यासाठी उपयुक्त असलेली यंत्रणा व सामग्री देशांतर्गत उत्पादकांच्या माध्यमातूनच खरेदी करता येईल. त्यामुळे संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरतेला आणि ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळेल. हा प्रकल्प साडेसहा वर्षात पूर्ण करायचा असल्याने त्या संबंधातील पायाभूत सुविधांची निर्मिती होईल. या प्रकल्पामुळे सुमारे एक लाख ८० हजार मानवी दिवस इतक्या रोजगाराची निर्मिती होईल, असेही संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
विनय चाटी
स्त्रोत: वृत्तसंस्था