पाणबुडी विरोधी कारवाईचा सराव करणार
दि. ०४ एप्रिल: नौदलाचे ‘पी८आय’ हे विमान जपानमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय नौदलाकडून बुधवारी देण्यात आली. नौदलाच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाज मध्यम अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. या दौऱ्यात परस्पर सहकार्याबरोबरच भारतीय नौदल जपानच्या सागरी स्वयं-सुरक्षा दलाबरोबर पाणबुडीविरोधी कारवाईचा सराव करार आहे. त्याचबरोबर विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या विमानाकडून या दौऱ्यात परस्पर सहकार्याबरोबरच पाणबुडी विरोधी कारवाई व सागरी कारवाईबाबत जपानच्या सागरी स्वयं-सुरक्षा दलाबरोबर सराव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सागरी टेहेळणी, विविध विषय तज्ञांची व्याख्याने आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती नौदलाच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून देण्यात आली आहे. जपानमधील अत्सुगी या तळावर हा ‘ब्रिजेस ऑफ फ्रेडशिप’ सराव होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारताच्या ‘आयएनएस कदमत’ या युद्धनौकेने दीर्घ पल्ल्याच्या तैनातीअंतर्गत उत्तर पॅसिफिक महासागरात असलेल्या जपानच्या युकोसुका या बंदराला भेट दिली होती. ‘आयएनएस कदमत’च्या जपानच्या भेटीमागे भारत आणि जपान मधील द्विपक्षीय सागरी सहकार्य वाढविणे हा उद्देश होता, असेही संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. यंदा जपानच्या सागरी स्वयं-सुरक्षादलाबरोबर होणाऱ्या सरावांमध्ये उभय देशांच्या युद्धनौकांना भेटी, व्यावसायिक अनुभवांची देवाण-घेवाण, संयुक्त योग शिबिर, सागरी भागीदारी व सराबाबत समन्वय, अशा बाबींचा समावेश आहे.
‘भारत आणि जपान दरम्यान दीर्घ सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहेत. दोन्ही देशांचा इतिहास व अध्यात्मिक संबंध अनेक शतकांपासून परस्परांवर आधारित आहेत; त्यामुळे भारत आणि जपान विशेष अशी सामरिक व जागतिक भागीदारी एकत्रपणे निभावू शकतात. भारत आणि जपानदरम्यान सुरक्षासंबंधी भागीदारी ही उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधातील अविभाज्य भाग आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या काही वर्षापासून भारत आणि जपानदरम्यान संरक्षण विषयक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील घडामोडी, या क्षेत्राची सुरक्षा आणि स्थैर्य व जागतिक शांतता या विषयात दोन्ही देशांची सामरिक भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.
विनय चाटी
स्रोत: वृत्तसंस्था