पाच जहाजे: खऱ्या अर्थाने ‘ब्लू वॉटर नेव्ही’, रसद पुरवठा सोपा
दि. ११ एप्रिल: खोल समुद्रात उभ्या असलेल्या युद्धनौकांना रसद पुरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जहाजांच्या (फ्लीट सपोर्ट शिप) कामाला (स्टील कटिंग) विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे बुधवारी सुरुवात झाली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, नौदलाच्या पूर्व विभाग मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर व हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमोडोर हेमंत खत्री (निवृत्त) व इतर वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
समुद्रात किनारपट्टीपासून दूरवरून प्रवास करणाऱ्या नौदलाच्या युद्धनौकांना ठराविक कालावधीनंतर रसद पुरवठ्यासाठी बंदरावर यावे लागते. बंदरावर येऊन रसद घेऊन पुन्हा समुद्री प्रवासाला निघणे हा कालावधी मोठा असतो, त्यामुळे या नौका या वेळात त्याचे निहित कार्य करू शकत नाहीत व नौदलाच्या ‘ऑपरेशनल’ क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे युद्धनौकांना प्रत्यक्ष बंदरावर न येता खोल समुद्रातच रसद पुरवठा करणाऱ्या जहाजांची आवश्यकता असते. अशा जहाजांना ‘फ्लीट सपोर्ट शिप’ असे म्हटले जाते. या प्रकारातील पाच जहाजांच्या कामाला बुधवारी हिंदुस्तान शिपयार्ड येथे सुरुवात झाली. जहाजबांधणी उद्योगात त्यासाठी ‘स्टील कटिंग’ या संज्ञेचा वापर केला जातो.
भारतीय नौदलाला अशा प्रकारच्या पाच ‘फ्लीट सपोर्ट शिप’ पुरविण्याचे कंत्राट हिंदुस्तान शिपयार्डला देण्यात आले होते. संरक्षण मंत्रालय व हिंदुस्थान शिपयार्ड यांच्यात २०२३मध्ये हा करार झाला होता. त्यानुसार या प्रकारातील पहिल्या पाच नौका २०२७ पर्यंत नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे. सुमारे ४० हजार टन वजनाच्या या नौकांमुळे खोल समुद्रात उभ्या असणाऱ्या नौदलाच्या युद्धनौकांना इंधन, पाणी, शस्त्रास्त्र व दारुगोळा, अन्न पुरविता येणार आहे. त्यासाठी समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांना बंदरावर येण्याची गरज उरणार नाही. या सपोर्ट शिपमुळे बंदरावर येऊन रसद घेऊन जाण्याचा वेळ वाचत असल्यामुळे नौदलाच्या युद्धनौका अधिक काळ समुद्रात राहू शकतात. परिणामी नौदलाची ‘ऑपरेशनल’ क्षमता वाढून ते खऱ्या अर्थाने ‘ब्लू वॉटर नेव्ही’ म्हणून कार्यरत राहू शकेल.
नौदलच्या जहाजांसाठी रसद पुरवठा करण्याबरोबरच या ‘फ्लीट सपोर्ट शिपचा’ उपयोग आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मानवीय सहाय्यता व आपत्ती निवारण कार्य, बचावकार्य, तातडीने मदत पुरवठा करणे आदी कामांसाठीही करता येऊ शकेल, अशाच पद्दतीने त्यांची बांधणी सुरु आहे. या जहाजांचे आरेखन पूर्णपणे स्वदेशी असून, त्यासाठी आवश्यक बहुसंख्य सामग्रीही देशांतर्गत उत्पादकांकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत जहाजबांधणी उद्योगाला प्रोत्साहन मिळणार असून, सरकारच्या आत्मनिर्भर भारत ‘मेक इन इंडिया-मेक फॉर द वर्ल्ड’ या धोरणालाही चालना मिळणार आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी