भारताकडून चीन सीमेवर ‘ड्रोण’विरोधी यंत्रणा तैनात

0
संरक्षण संशोधन व विकास संस्था’ (डीआरडीओ) आणि ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेली ‘आयडी अँड आयएस’ ही ‘ड्रोण’विरोधी यंत्रणा. छायाचित्र: पीआयबी

सीमेवरील हवाई संरक्षणक्षमता वाढवण्यासाठी लष्कराचे पाऊल

दि. २२ मार्च: चीनबरोबरच्या विवादित प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हवाई संरक्षणक्षमता वाढविण्यासाठी या सीमाभागात देशांतर्गत विकसित ‘इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम,’ (आयडीडी अँड आयएस) ही ‘ड्रोण’चा शोध घेऊन त्याचा नाश करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. ‘संरक्षण संशोधन व विकास संस्था’ (डीआरडीओ) आणि ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘आयडी अँड आयएस’ ही ‘ड्रोण’विरोधी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेचे ही ‘मार्क-वन’ (पहिली आवृत्ती) आवृत्ती आहे. यामुळे संरक्षण तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत संशोधन व विकासाला चालना मिळणार आहे.

चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय भागामध्ये हेरगिरी करण्यासाठी सातत्याने ‘ड्रोण’चा वापर करण्यात येतो. त्यामुळे हवाई संरक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून लष्कराने या भागात स्वदेशांतर्गत विकसित ‘ड्रोण’विरोधी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. या यंत्रणेमुळे चीनकडून सोडण्यात येणाऱ्या ‘ड्रोण’तातडीने शोध घेता येणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून चीनकडून सोडण्यात आलेल्या ‘ड्रोण’ला ‘जॅमिंग टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून निकामी करणे शक्य होणार आहे. यामुळे दोन ते पाच किलोमीटर परिघातील ‘ड्रोण’चा शोध घेऊन निकामी करता (सॉफ्ट किल) येऊ शकतात. गरज पडल्यास शत्रूने सोडलेले ‘ड्रोण’ नष्ट करण्यासाठी ही यंत्रणा ‘हार्ड किल’स्तरावर नेता येऊ शकते. या माध्यमातून आठशे मीटर अंतरावरील ‘ड्रोण’ नष्ट करता येऊ शकतात. तर, पाच ते आठ किलोमीटर परिघातील ‘ड्रोण’बाबत पूर्व सूचना मिळू शकते. त्यामुळे ‘ड्रोण’विरोधात कारवाई करणे सोपे होणार आहे. सुरुवातीला ही यंत्रणा लष्कराच्या हवाई संरक्षण विभागाच्या ‘ड्रोण’विरोधी यंत्रणेबरोबरच तैनात करण्यात येणार आहे. नंतरच्या टप्प्यात संपूर्ण सीमा सुरक्षेसाठी याचा वापर करण्यात येईल.

विनय चाटी

स्त्रोत: वृत्तसंस्था


Spread the love
Previous articleनौदलाच्या ‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’ कवायतीला सुरुवात
Next articleIndia Leads Trilateral Maritime Exercise With Mozambique-Tanzania In East Coast Of Africa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here