भारताने देशांतर्गत विकसित केलेले तेजस हे हलके लढाऊ विमान आपल्या हवाईदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यास फिलीपिन्स उत्सुक असल्याची माहिती फिलिपिन्सच्या दक्षिण लुझोन येथील नौदल विभागाचे प्रमुख कमोडोर जो ओरबे अंथोनी यांनी ‘भारतशक्ती’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या ‘मिलन-२०२४’ या भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या द्वैवार्षिक बहुपक्षीय नौदल कवायतीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कमोडोर ओरबे हे फिलिपिन्सच्या नौदलाच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्त्व करीत आहेत. ‘भारताकडून आम्ही ब्राह्मोस क्षेपणास्त्रे घेतली आहेत. त्या व्यतिरिक्त सध्या तरी आमच्याकडे ‘तेजस’बद्दल काहीच माहिती नाही. आमच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचा कार्यगट त्याबाबत अभ्यास करून आमच्या संरक्षणमंत्र्यांना याबाबतची माहिती देईल आणि त्यांच्या स्तरावरच संरक्षण सामग्रीच्या खरेदीचा निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘फिलीपिन्सचे नौदल वेगाने विकसित होत आहे. या प्रक्रियेत आम्हाला इतर नौदलांकडून सहाय्य आणि प्रशिक्षणाची गरज आहे. आम्ही आमचे अनुभवही इतर नौदलांबरोबर ‘शेअर’ करीत आहोत. भारतीय नौदल खोल समुद्रातील कारवाई, प्रशिक्षण आशा बाबतीत फारच प्रगत आहे. या कवायतीला आम्ही विद्यार्थ्याच्या भूमिकेतूनच आलो आहोत आणि विविध लष्करी तळांवर प्रशिक्षण घेत आहोत,’ असेही कमोडोर ओरबे म्हणाले. ‘मिलन-२०२४’मध्ये सहभागी होणे आमच्या अनुभववृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. उभय देशांदरम्यान संरक्षण सहकाऱ्याबाबत संभावना शोधण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड (एचएएल), भारत डायनामिक्स यांच्यासह इतर कंपन्यांचा सहभाग असलेल्या भारतीय संरक्षण उत्पादक कंपन्यांच्या शिष्टमंडळाने फिलिपिन्सला भेट दिली होती. भारताचे फिलिपिन्समधील राजदूत शंभू कुमारन यांनी या वेळी नौदल प्रणाली, लढाऊ विमान उत्पादन, हेलिकॉप्टर, लढाऊ हेलिकॉप्टर, तोफा आदी संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात असलेल्या भारताच्या क्षमतेचे सादरीकरण फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यासमोर केले होते. याचा फिलिपिन्सलाही त्यांच्या संरक्षण क्षमतांच्या वृद्धीसाठी उपयोग होऊ शकतो, असेही कुमारन यांनी स्पष्ट केले होते.
फिलिपिन्स ‘री-होरायझन-३’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या लष्करी आधुनिकीकरणाच्या प्रकियेला येत्या दशकात गती देणार असून त्यासाठी सुमारे दोन ट्रीलीअन पेसोची (फिलिपिन्सचे चलन) तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. जानेवारी २०२२ मध्ये फिलिपिन्सने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस’बरोबर ३०.५ कोटी डॉलरचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीचा करार केला आहे. त्याशिवाय फिलिपिन्सचे लष्करही भारतीय क्षेपणास्त्र खरेदीसाठी उत्सुक असल्याचे समजते. ही क्षेपणास्त्रे येत्या मार्चपर्यंत फिलिपिन्सला देण्यात येणार असून भारताकडून त्याची तयारी सुरु आहे. ब्राह्मोस निर्यातीची प्रक्रिया फेबुवारीपासून सुरु होईल. सुरुवातीला त्याची जमिनीवरील यंत्रणा व मार्चपर्यंत संपूर्ण क्षेपणास्त्र यंत्रणा फिलिपिन्सला देण्यात येईल, असे संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे अध्यक्ष समीर कामत यांनी नुकतेच स्पष्ट केले होते.
दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्स आणि चीन यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ही क्षेपणास्त्रे फिलिपिन्सला मिळणार आहेत, त्यामुळे त्यांच्या नौदलच्या क्षमतेत वाढ होणार आहे व चीनच्या या भागातील विस्तारवादाला तोंड देण्याची क्षमता फिलिपिन्सला प्राप्त होणार आहे. त्या दृष्टीनेही या कडे पहिले जात आहे.
रविशंकर, विशाखापट्टणम
अनुवाद- विनय चाटी