ऑस्ट्रेलियाच्या नौदलप्रमुखांची भारताला भेट, ‘इंडो-पॅसिफिक’बाबत चर्चा
दि. ०४ एप्रिल: ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये समन्वय वाढविण्याबरोबरच परस्पर नौदल सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे नौदलप्रमुख व्हाइस ॲडमिरल मार्क हॅमंड यांनी बुधवारी भारताचे नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरीकुमार यांची भेट घेतली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
उभय देशांतील नौदल सहकार्य व परस्पर सामंजस्य अधिक वाढविण्याच्या संभावना शोधण्यासाठी व्हाइस ॲडमिरल मार्क हॅमंड सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात उभय देशांच्या नौदलात माहितीची देवाणघेवाण, प्रशिक्षण व इतर विषयांत सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. या दौऱ्यात व्हाइस ॲडमिरल हॅमंड भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल अनिल चौहान व संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांचीही भेट घेणार आहेत. त्याचबरोबर नौदलाच्या महत्त्वाच्या ठिकाणांना त्याच्या भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. यात नौदलाच्या कोची येथील दक्षिण विभाग मुख्यालय व मुंबई येथील पश्चिम विभाग मुख्यालयाचा समावेश आहे. या दोन्ही विभागांच्या प्रमुखांशीही ते चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आयएनएस विक्रांत, ध्रुव एकात्मिक सिम्युलेटर प्रकल्प, मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड व माझगाव डॉकयार्ड लिमिटेडचा समावेश आहे.
इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत दोन्ही देशांचा समान दृष्टीकोन असल्यामुळे भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश परस्परांचे मजबूत भागीदार होऊ शकतात आणि ही भागीदारी उभय देशांसाठी लाभदायक ठरू शकते. तसेच, ‘इंडियन ओशन नेव्हल सिंपोजियम,’ ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन,’ ‘वेस्टन पॅसिफिक नेव्हल सिंपोजियम,’ आसियान डिफेन्स मिनिस्टर मिटिंग प्लस,’ आणि ‘क्वॉड’ अशा द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर उभय देश परस्पर सहकार्य करीतच आहेत. ऑस्ट्रेलियाची युद्धनौका वार्रामुंगा भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या मिलन-२४ या बहुपक्षीय नौदल कवायतीतही सहभागी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या नौदलप्रमुखांचा भारत दौरा महत्त्वाचा मनाला जात आहे.
जागतिक स्तरावर, तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात २०२४ मध्ये होत असलेल्या भूराजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलियातील सहकार्य महत्त्वाचे मानले जात आहे. सागरी सामंजस्य, सायबर सुरक्षा, पारंपरिक सुरक्षा धोके अशा बाबतीत दोन्ही देशांनी त्यांच्या द्विपक्षीय नौदल सहकार्यात वाढ केली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान व अमेरिकेचा समावेश असलेल्या ‘क्वॉड’ या बहुपक्षीय व्यासपीठाच्या माध्यमातूनही हे सहकार्य वाढत आहे. द्विपक्षीय सहकार्याबरोबरच, उच्चपदस्थांच्या परस्पर देशांना भेटी, नौदल व सुरक्षा सहकार्य अशा माध्यमातूनही दोन्ही देश अधिक जवळ येत आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतही हे सहकार्य पुढे घेऊन जाण्याबाबत एकमत झाले होते. त्यामुळे बदलत्या भूराजकीय व भूसामारिक परिस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य महत्त्वाचे मानले जात आहे.
विनय चाटी