देशांतर्गत निर्मिती: डीआरडीओ व लष्कराने घेतली चाचणी
दि. १४ एप्रिल: रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (मॅन पोर्टेबल अँटी टॅंक गायडेड मिसाईल वेपन सिस्टीम-एमपीएटीजीएम) शनिवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) व लष्कराच्यावतीने राजस्थानातील पोखरण येथील ‘फायरिंग रेंज’वर ही चाचणी घेण्यात आली.
स्वयंपूर्णतेच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणेच्या विविध परिस्थितीत आणि वेगवेगळ्या प्रारूपातील हवाईचाचणी घेण्यात आली. अतिउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्र यंत्रणेला अचूकता मिळवून देण्याचा उद्देश या मागे होता. या प्रसंगी क्षेपणास्त्रे डागण्याची यंत्रणा (लॉन्चर), लक्ष्य निर्धारण यंत्रणा, मारा नियंत्रण यंत्रणा अशा सर्वंकष यंत्रणेची चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. पायदळाला आवश्यक असलेल्या गुणवत्तेनुसार ही यंत्रणा विकसित झाली आहे का, ते पाहण्यासाठी अनेक वेळा या यंत्रणेच्या माध्यमातून क्षेपणास्त्र डागून त्याची खातरजमा करण्यात आली. त्याचबरोबर स्फोटकांसह (वॉर-हेड) घेण्यात आलेली चाचणीही यशस्वी ठरली, असे या पत्रकात म्हटले आहे.
‘एमपीएटीजीएम’च्या ‘टॅंडेम वॉर-हेड सिस्टीम’ची अत्याधुनिक मुख्य रणगाड्याचे (मेन बॅटल टॅंक) पोलादी कवच भेदण्याची क्षमता जोखण्याची चाचणीही या वेळी घेण्यात आली. ही चाचणी ठरविलेल्या निकषांवर उत्तीर्ण झाली. या यंत्रणेचा वापर दिवसा आणि रात्री असा दोन्ही वेळेस करता येणार आहे. अशी क्षमता रणगाडाविरोधी युद्धात महत्त्वाची असते. या देशांतर्गत निर्मित तंत्रज्ञानाच्या क्षमतेचे प्रदर्शन पूर्ण झाले असून, आता ते तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरकर्त्यांना चाचणीसाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय लष्करात या क्षेपणास्त्र यंत्रणेचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंग, संरक्षण सचिव गिरीधर आरमाने, तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास विभागाचे सचिव आणि ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी या यशाबद्दल सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी