दि. १ मार्च: संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि जर्मनी यांच्यात जर्मनीची राजधानी बर्लिन येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी त्यांचे समकक्ष व जर्मनीचे संरक्षण सचिव बेनेडिक्ट झिमर यांच्यासह संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. द्विपक्षीय सुरक्षा संबंधित विषयाबरोबरच संरक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिगत करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. उभय देशांनी आपला क्षेत्रीय सुरक्षा विषयक दृष्टीकोनही या बैठकीत मांडला, तसेच भारत आणि जर्मनी यांच्यात इंडो-पेसिफिक क्षेत्रातील संभाव्य संयुक्त लष्करी कवायातीच्या शक्यतेबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
भारत आणि जर्मनी यांच्यात राजनैतिक संबंध अधिक मजबूत होत असताना संरक्षण सहकार्य व उभय देशांत संरक्षण विषयक प्रकल्प व दोन्ही देशातील संरक्षण उद्योगांच्या भागीदारीबाबतची शक्यताही पडताळून पाहण्याचे या वेळी ठरविण्यात आले. दोन्ही देशांच्या संरक्षण दलांना उपयुक्त ठरतील, अशा संरक्षण उच्च तंत्रज्ञानविषयक क्षेत्रात भागीदारीच्या संभावना शोधणे, हा या बैठकीचा मुख्य हेतू होता. त्याचबरोबर या क्षेत्रातील नवसंकल्पना व संशोधनाला चालना देण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. भारत व जर्मनी यांच्यातील परस्पर सामरिक सहकार्य यामुळे अधिक वृद्धींगत होईल, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्तोरीअस यांनी गेल्यावर्षी भारताला भेट दिली होती. या भेटीत त्यांची भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याशी चर्चा झाली होती. त्याला अनुसरूनच हे विषय या उच्चस्तरीय बैठकीत चर्चेला घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीनंतर संरक्षण सचिव अरमाने यांनी बर्लिन येथील ‘जर्मन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अफेयर्स’ (Stiftung Wissenschaft und Politik – SWP) या संस्थेला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘भारत आणि जर्मनी हे उभय देश एकत्रितपणे जागतिक सुरक्षेला असलेल्या आव्हानांचा सामना करीत आहेत, यामुळे माहिती आणि ज्ञान यांची देवाणघेवाण व बौद्धिक सहकार्य या विषयांवर या चर्चेत भर देण्यात आला. क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षा व शांतीसाठी उभय देशांदरम्यानचे सहकार्य अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. तसेच हिंदी महासागर क्षेत्राबद्दल व तेथील परिस्थिती स्थिर ठेवण्याबद्दलही उभय देशांत एकमत झाले. दोन्ही देशांच्या परस्परसंबंधात वाढ होत असून या भेटीमुळे त्याला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.
विनय चाटी