भारतीय लष्कराच्या अभिमानास्पद कामगिरीच्या अनेक कहाण्या आहेत. अलीकडच्या काळातील गलवान खोऱ्यातील चिनी सैनिकांबरबरोबरची हाणामारी, पाकिस्तानवरील एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइकपासून कारगिल युद्ध आणि 1971चे युद्ध अशा एक ना अनेक… पण 1971चं युद्ध म्हणजे भारतीय लष्कराच्या शौर्याची परिसीमाच होती. भारतीय लष्करापुढे पाकिस्तानच्या 92 हजार सैनिकांनी गुडघे टेकले. लष्कराच्या रणभूमीवरील या कामगिरीला जोड मिळाली ती गुप्तचर यंत्रणेच्या रणनीतीची…
1947 साली भारत आणि पाकिस्तान असे दोन देश जगाच्या नकाशावर दिसत असले तरी, पाकिस्तान मात्र तिसऱ्या फाळणीच्या उंबरठ्यावर होता. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन तट पडले होते. त्यांच्यात धुसफूस सुरू होती. पश्चिम पाकिस्तान राजकीय, सामाजिकदृष्ट्या कायमच पूर्व पाकिस्तानवर कुरघोडी करत होता. सैनिकांकडून अत्याचारही सुरू होते. त्याविरोधात पूर्व पाकिस्तानातील नागरिक रस्त्यावर उतरले. हे बंड दडपून टाकण्यासाठी पाकिस्तानी सैन्य सरसावले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला. असंख्य महिलांवर अत्याचार केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी मायदेश सोडून आसपासच्या देशांमध्ये आसरा घेतला. भारतातही जत्थेच्या जत्थे येऊ लागले. त्याचा सर्वच यंत्रणांवर ताण येऊ लागला. विशेषत:, त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था तेवढी सक्षम नव्हती, अशा वेळी तिच्यावर देखील हा भार पडला होता. भारताने यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर एक रणनीती तयार करण्यात आली होती.
वातावरण असे निर्माण करायचे की, भारताला युद्धात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भाग पाडायचे आणि मग आक्रमक होत भारताने पाकिस्तानच्या नाकीनऊ आणायचे, अशी ही रणनीती होती. त्याची व्यूहरचना भारतीय लष्कराच्या रिसर्च अँड अॅनेलिसिस विंग (आरएनएडब्ल्यू – रॉ) या भारताच्या गुप्तचर यंत्रणेने आखली होती. ती यशस्वीही ठरली. हीच यंत्रणा पडद्यामागची सूत्रधार होती.
भारताला युद्धाची सुरुवात करायची नव्हती. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा होती. रॉच्या रणनीतीमुळे तशी संधी भारताला मिळाली. रॉमध्ये शंकरन नायर हे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. आर. एन. काव हे प्रमुख होते. पाकिस्तानचे तत्कालीन हुकूमशहा जनरल याह्या खान यांच्या कार्यालयात भारतीय हेर होता. तो तेथील हालचालींची खबर देत होता. त्याच्याकडून अशीच एक महत्त्वाची खबर शंकरन नायर यांना मिळाली. रॉ मुख्यालयाला सांकेतिक स्वरुपात तो संदेश मिळाला होता. पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिमी भागावर हवाई हल्ला करण्यात येणार होता. नायर यांनी तशी सूचना तत्कालीन एअर चीफ मार्शल पी. सी. लाल यांना दिली. यासाठी 1 डिसेंबरपासूनच 24 तासांचा रेडअलर्ट देण्यात आला. हवाई दलाची ही सर्वोच्च दक्षता आहे. त्यानुसार तातडीने हालचाली सुरू झाल्या. त्या भागातील हवाई तळावरील महत्त्वाची यंत्रणा हलविण्यात आली. या हल्ल्यांना उत्तर देण्याची सज्जता करण्यात आली.
विशेष म्हणजे, 2 तारखेला हल्ला होणार अशी खबर मिळाली होती. संध्याकाळ सरली तरी, पाकिस्तानकडून कोणतीही आगळीक झाली नाही. 1 डिसेंबरपासूनच रेडअलर्ट जारी केला होता. म्हणून एअर चीफ मार्शल हे शंकरन नायर यांच्याकडे गेले आणि आता इतका वेळी हवाई दलाला रेडअलर्ट ठेवता येणार नाही. त्यामुळे पुढे काय करायचे, असे विचारले. वस्तुत: हवाई दलाला केवळ 24 तासांवर रेडअलर्ट ठेवता येते. इथे तर जवळपास 36 तास होत आले होत, त्यामुळे रेडअलर्ट कधीपर्यंत ठेवायचा हा प्रश्न होता. पण इतक्या वर्षांचा हेरगिरीचा अनुभव गाठीशी असलेल्या आणि पाकिस्तानची मनोवृत्ती जाणून असलेल्या शंकरन नायर यांनी आणखी 15 तास रेडअलर्ट वाढविण्याची विनंती केली. त्यानुसार रेडअलर्ट वाढविण्यात आला.
3 डिसेंबर 1971ला पाकिस्तानची विमाने पश्चिमेकडील भारतीय हवाई हद्दीत येऊन धडकलीच, भारतीय हवाई दल दक्ष होतेच, पाकच्या हल्ल्यात फार हानी झाली नाही. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला आणि पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले.
गंमतीचा भाग म्हणजे, ह्याया खान यांच्या कार्यालयातील हेराने पाकिस्तान हल्ल्याची 3 डिसेंबर हीच तारीख दिली होती. भारतातील गुप्तचर यंत्रणेकडील संबंधित व्यक्तीने अथवा व्यक्तींनी त्या सांकेतिक मेसेजचा अर्थ 3 डिसेंबरऐवजी 2 डिसेबर घेतला. काही का असेना, पूर्वकल्पनेमुळे भारतीय हवाई दलाचे फार नुकसान झाले नाही. उलट भारतीय हवाई दलाने अवघ्या 48 तासांत प्रतिहल्ला करून पाकस्तानी हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त केले. कुठे आणि कसे हल्ले करायचे याची व्यूहरचना आधीच तयार होती. पाकिस्तानच्या हल्लाचे निमित्त करीत ती वास्तवात उतरवण्यात आली. हवाई दलाच्या या कामगिरीमुळे भारतीय लष्कराने सहजरीत्या पूर्व पाकिस्तानात शिरून उत्तर, दक्षिण आणि मध्य भागांतवर चढाई करत ढाक्याला घेरले आणि अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानला दाती तृण धरायला लावले.
अर्थातच, नौदलाची देखील यात लक्षणीय कामगिरी राहिली आहे. 4 डिसेंबर हा नौदल दिन आहे. नौदलाने कराची बंदराची नाकाबंदी केली. एवढेच नव्हे तर, भारतीय नौदलाच्या तीन मिसाईल बोटीद्वारे कराची बंदराजवळील पाकिस्तानचा तेलाचा साठा उद्ध्वस्त केला. अशा प्रकारे तिन्ही दलाने अल्पावधीत आणि सहजरीत्या पाकिस्तानला धूळ चारली. 16 डिसेंबरला पाकिस्तानने शस्त्र खाली ठेवली. 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली. एवढ्या मोठ्या संख्येने कधीच युद्धबंदी बनले नव्हते. पूर्व पाकिस्तानचे लष्करप्रमुख लेफ्ट. जनरल ए. के. नियाझी यांनी पराभव मान्य केला आणि त्यांनी जाहीरपणे शरणागती पत्करली. अशा रीतीने पाकिस्तानच भारताने टाकलेल्या जाळ्यात अडकली. त्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली आणि भारतीय उपखंडात हा मोठा बदल मानला जातो.
– नितीन अ. गोखले
(शब्दांकन – मनोज जोशी)