मार्च 2014 मध्ये 239 लोकांसह बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या एम. एच. 370 विमानाचा नव्याने शोध घेण्याचा विचार असल्याचे मलेशियाचे परिवहन मंत्री अँथनी लोके यांनी जाहीर केले. 10 वर्षांपूर्वी विमानासह बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांनी क्वालालंपूरमधील सुबांग जया येथील एका मॉलमध्ये आयोजित केलेल्या स्मृती कार्यक्रमात बोलताना लोके म्हणाले की, “बेपत्ता विमान शोधण्यासाठी पैसा हा मुद्दा नव्हता आणि एम. एच. 370 च्या शोध मोहिमेबाबत सरकार ठाम आहे. या मोहिमेमुळे बेपत्ता विमानाचा शोध घेता येईल आणि जवळच्या नातेवाईकांना सत्य परिस्थिती सांगता येईल अशी, आम्हाला खरोखर आशा आहे.”
8 मार्च 2014 रोजी, 227 प्रवासी आणि डझनभर मलेशियन क्रू सदस्यांसह बीजिंगहून क्वालालंपूरला जाणाऱ्या बोईंग 777 विमान रडारवरून गायब झाले. त्यानंतर त्याचा शोध घेण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. जे अनेकदा विमान उड्डाणाच्या इतिहासातील सर्वात मोठे प्रयत्न म्हणून ओळखले जातात.
ओशन इन्फिनिटी या अमेरिकेच्या सीबेड एक्सप्लोरेशन फर्मने ‘शोध लागला नाही, तर त्याचे शुल्कही नाही’ असे आश्वासन देत, पुन्हा एकदा समुद्राचा तळ शोधण्याचा प्रस्ताव दिल्याचे लोके यांनी जाहीर केले. या घोषणेचे तिथे उपस्थित असणाऱ्या परिजनांनी स्वागत केले. “आम्ही आता त्यांच्याकडून येणाऱ्या योग्य तारखांची वाट पाहत असून त्यांना लवकरच भेटू अशी मला आशा आहे”, असे लोके पुढे म्हणाले.
2018 मध्ये याच कंपनीने केलेल्या अशा प्रकारच्या शोध मोहिमेत किंवा त्याआधी 2017च्या सुरुवातीला मलेशिया, चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या मोहिमेत विमानाचा कोणताही मागमूस लागला नाही. अर्थात मोझांबिक, रियुनियन बेट, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, टांझानिया आणि इतर ठिकाणी वाहून गेलेले काही अवशेष हे याच विमानाचे आहेत असा संशय व्यक्त झाला होता. हे विमान रहस्यमयपणे बेपत्ता झाल्यामुळे त्याचे अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न, यांत्रिक अपयश, क्षेपणास्त्र हल्ला किंवा अगदी पायलटची आत्महत्या यासारख्या अनेक तर्कवितर्कांना चालना मिळाली. पण जोपर्यंत विमान आणि त्याचा ब्लॅक बॉक्स सापडत नाही, तोपर्यंत ते केवळ तर्कच राहतील.
(अनुवाद : आराधना जोशी)