दक्षिण गाझातील रफाहवर सोमवारी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात सहा महिला आणि पाच मुलांसह किमान 22 लोक ठार झाल्याचे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्रीपर्यंत झालेल्या या हवाई हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या मुलांपैकी एक मूल फक्त 5 दिवसांचे होते. इजिप्तसह अरब देशांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
सोमवारी रफाहमधील इस्रायली हवाई हल्ल्यानंतर इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले आहेत. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने नियमितपणे रफाहवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. रफाह हा हमासचा शेवटचा प्रमुख बालेकिल्ला असल्याचे सांगत आता जमिनीवरून लष्करी हल्ला करण्याची धमकी इस्रायलने दिली आहे. दहा लाखांहून अधिक पॅलेस्टिनींनी इजिप्तच्या सीमेवरील शहरात आश्रय घेतला आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून इस्रायलला आक्रमण न करण्याचे आवाहन अमेरिका आणि इतर देशांनी केले आहे.
या हल्ल्याबाबत इस्रायली संरक्षण दलाने म्हटले आहे की त्यांना आयता अल-शाब भागात कार्यरत असलेला हिजबुल्लाचा एक दहशतवादी लष्करी इमारतीत प्रवेश करताना आढळला. लढाऊ विमानांनी हल्ला करून त्याला ठार मारले.
युद्धाच्या वाढत्या संकटादरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन सोमवारी मध्यपूर्वेत दाखल झाले. गाझामधील युद्धजन्य आपत्ती कमी करण्यासाठी त्यांनी येथे आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांना युद्धबंदीची विनंती केली. इस्रायलने या विनंतीवर विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ब्लिंकन यांनी इस्रायलच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला “विलक्षण उदार” म्हटले. “या क्षणी, गाझाचे लोक आणि युद्धबंदी यांच्यातील एकमेव कारण म्हणजे हमास आहे”, असे त्यांनी सौदीची राजधानी रियाध येथे जागतिक आर्थिक मंचाचे (डब्ल्यूईएफ) अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांना सांगितले. हमासला यावर त्वरित निर्णय घ्यावा लागेल. मला आशा आहे की ते योग्य निर्णय घेतील, असेही ब्लिंकन म्हणाले.
ब्लिंकन यांच्याशिवाय, रियाधमध्ये असलेले इजिप्तचे परराष्ट्र मंत्री समेह शौकरी यांनीही युद्धबंदीचा गंभीरपणे विचार करण्याचा सल्ला दिला. इस्रायल आणि हमास दोघेही हा ठराव स्वीकारतील अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. शौकरी यांनी सोमवारी रियाध येथे झालेल्या डब्ल्यूईएफ पॅनेलला सांगितले की, “युद्धबंदीचा प्रस्ताव टेबलवर आहे, ज्यावर दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल आणि तो स्वीकारावा लागेल.”
गाझा येथील हमासचा उपप्रमुख खलील अल-हय्याच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांना सादर केलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावावर तसेच इस्रायलच्या प्रतिसादावर चर्चा करेल, असे हमासने स्पष्ट केले आहे.
आराधना जोशी