26/11/2008 रोजी, मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी, Tahawwur Rana याचे अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर, बुधवारी रात्री किंवा गुरुवारी पहाटे एका विशेष विमानाने अखेर भारतात आणले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची अंतिम याचिका फेटाळल्यानंतर, अखेर त्याला भारतात परत आणले जात आहे.
न्यायालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, “मुख्य न्यायाधीशांना उद्देशून न्यायालयाकडे पाठवलेला प्रत्यार्पण स्थगितीचा अर्ज फेटाळण्यात येत आहे.” राणा याची अशीच एक याचिका यापूर्वी मार्चमध्ये फेटाळण्यात आली होती.
राणाने त्याच्या विनंती अर्जामध्ये गंभीर आरोग्यविषयक समस्यांचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये पोटातील महाधमनी, धमनीविकार, पार्किन्सन या आजारामुळे होणारा संज्ञानात्मक ऱ्हास आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा संशय व्यक्त केला होता.
त्याने असा दावा केला होता की, त्याच्या खालावलेल्या आरोग्यामुळे तो भारतातील खटला चालवू शकणार नाही. तसेच, त्याने असा आरोप केला होती की त्याची राष्ट्रीयता, धर्म आणि पार्श्वभूमीमुळे भारतात त्याच्यावर अन्यायच होईल.
फेब्रुवारीमध्ये प्रत्यार्पणाची पुष्टी
फेब्रुवारीमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत, पहिल्यांदा राणा याच्या प्रत्यार्पणाची घोषणा सार्वजनिकरित्या करण्यात आली होती, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राणाला भारतात न्याय मिळवून दिला जाईल, अशी घोषणा केली होती.
पाकिस्तानी वंशाचे व्यापारी, डॉक्टर आणि इमिग्रेशन सेवा उद्योजक असलेला तहव्वुर राणा, हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी असल्याची समजते, जो 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारांपैकी एक होता.
ISI आणि LeT सोबत संबंध
राणाचे पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंध असल्याचे मानले जाते.
अमेरिकेच्या एका ज्युरीने त्याला मुंबई हल्ल्यांना थेट पाठिंबा देण्याच्या आरोपातून मुक्त केले असले तरी, त्याला दहशतवादी कारवायांशी संबंधित दोन इतर आरोपांवर दोषी ठरवण्यात आले आणि दहा वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
कोव्हिड-19 च्या काळातील आरोग्याच्या सुटकेनंतर, त्याला भारतात प्रत्यार्पणासाठी पुन्हा अटक करण्यात आली. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, त्याचे अंतिम आव्हान नाकारण्यात आले आहे, ज्यामुळे भारतात आरोपांना सामोरे जाण्यासाठी त्याचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)