जी 7च्या अपयशामुळे 31 हजार युक्रेनियन सैनिक मारले गेले झेलेन्स्कींचा दावा

0

 

दोन वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत किमान 31 हजार युक्रेनियन सैनिक आणि ‘हजारो नागरिक’ मारले गेले आहेत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी जाहीर केले.

रशियाकडून सांगण्यात येत असलेल्या मृतांच्या आकडेवारीबद्दल निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आपण योग्य ती आकडेवारी जाहीर करत असल्याचे ते म्हणाले. “31 हजार सैनिक मारले गेले आहेत. 3 लाख किंवा दीड लाख किंवा जे काही (रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर) पुतीन आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे सगळेच जी आकडेवारी सांगत आहेत, ती खोटी आहे. मात्र झालेले हे नुकसान आमच्यासाठी मोठंच असल्याचं झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं असलं तरी, जखमींची संख्या सांगण्यास नकार दिला; कारण यामुळे रशियन सैन्याला पुढील नियोजनास मदत होईल. रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या भागातील हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करताना ते म्हणाले की, मृतांची अचूक आकडेवारी आता सांगता येणार नाही. त्यापैकी किती लोक मृत्युमुखी पडले, कितीजणांचा खून झाला, कितीजणांचा छळ झाला आणि किती निर्वासित केले गेले हे मला माहीत नाही. रशियाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे किमान 1 लाख 80 हजार सैनिक मारले गेले असून हजारो जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

रशियाबरोबरच्या युद्धात अलीकडेच युक्रेनच्या झालेल्या पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्कींचे हे वक्तव्य आले आहे. युक्रेनियन लोकांचे मृत्यू आणि प्रदेशाच्या झालेल्या हानीला पाश्चात्य देशांची वेळेवर न आलेली मदत देखील कारणीभूत असल्याचे त्यांचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव्ह यांचे मत आहे. “आम्ही शक्य – अशक्य सर्वकाही प्रयत्न करत आहोत; परंतु वेळेवर रसद पुरवली न गेल्याने आम्हाला नुकसान सहन करावे लागत आहे,” असे उमरोव्ह म्हणाले. “सध्या मदतीचे वचन देऊनही त्याची पूर्तता (पाश्चात्य देशांकडून) होत नाही,” असेही त्यांनी सांगितले.

युक्रेनमध्ये रशियाने त्याचे विशेष लष्करी ऑपरेशन सुरू करून दोन वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी एक दिवस आधीच जी-7च्या व्हर्च्युअल मिटींगला संबोधित केले. (कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्सचा समावेश असलेल्या 7 औद्योगिक राष्ट्रांच्या गटासह युरोपियन युनियन म्हणजे ‘गणना न केलेले सदस्य’) एक्स या (पूर्वीच्या ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ते म्हणालेः “जी-7मधील जगातील प्रमुख लोकशाहीवादी देशांच्या नेत्यांना मी संबोधित केले. गेली दोन वर्षे त्यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचे आभार मानले. 24 फेब्रुवारीचा भयंकर दिवस आणि नंतर रशियाने निर्माण केलेली भीती जरी असली तरी त्यामुळे युक्रेनचे सामान्य भविष्य ते हिरावून घेऊ शकत नाहीत. प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आणि क्रांतीवाद यांचा, ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांचाच पराभव केला जाऊ शकतो आणि अशा परिणामांमुळे खरी सुरक्षा तसेच लोकशाहीच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. आपण अनेकदा ऐकतो की, इतिहास या सगळ्याकडे पाहत आहे आणि हे अगदी खरे आहे. आपल्या आकाशाचे रक्षण करण्यासाठी आणि जमिनीवर आपले सैन्य बळकट करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे हे नेत्यांना चांगले माहीत आहे, तसेच सागरी सुरक्षिततेत यशस्वी होण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसाठी योग्य वेळेत योग्य मदत लागणार याची त्यांना जाणीव आहे. आम्ही त्यांच्या मदतीवर अवलंबून आहोत. सुरक्षा पुनर्स्थापित करण्यासाठी आमचे नेतृत्व पुरेसे आहे. जेव्हा जगातील आघाडीची लोकशाही खरोखरच निर्णायक टप्प्यावर असते, तेव्हा त्यांचा संकल्प सर्व आव्हानांवर मात करतो.”

जी-7च्या वतीने व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही जी-7च्या नेत्यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन युक्रेनला आमच्याकडून असलेल्या अखंड पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आणि युक्रेनच्या स्वातंत्र्य तसेच लोकशाहीच्या भविष्यासाठी अथक लढा देणाऱ्या युक्रेनच्या लोकांच्या शौर्य आणि लढाऊ वृत्तीला पुन्हा एकदा सलाम करतो.”

“राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनवर ताबा मिळवण्याचे त्यांचे धोरणात्मक उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी ठरले आहेत. ते रोज आपल्या सरकारच्या बेपर्वा कृतींची मोठी किंमत मोजण्यास आपल्याच लोकांना भाग पाडत आहे. अनावश्यक युद्धासाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी रशियाची संसाधने वाया घालवली आहेत, रशियन कुटुंबांना विस्थापित केले आहे आणि शेकडो, हजारो रशियन लोकांचा बळी घेतला आहे,” असे प्रतिपादन जी 7कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे, “युक्रेनच्या स्वसंरक्षणासाठीच्या अधिकाराला आमचा कायम पाठिंबा आहे आणि युक्रेनच्या दीर्घकालीन सुरक्षेसाठी या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत राहू, ज्यामध्ये द्विपक्षीय सुरक्षाविषयक वचनबद्धता, व्यवस्थांची पूर्तता आणि अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे”, असेही नमूद करून या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही युक्रेनसाठी आमच्या सुरक्षाविषयक मदतीत वाढ करत आहोत आणि त्यासाठी आमची उत्पादन तसेच वितरण क्षमता वाढवत आहोत.”

“युक्रेन या अथक युद्धाच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना, तिथले सरकार आणि जनता आवश्यकतेनुसार जी-7च्या पाठिंब्यावर आश्वस्त राहू शकते”, असेही निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.

मात्र, युक्रेनसाठी बायडेन प्रशासनाने जाहीर केलेले 60 अब्ज डॉलर्सचे मदतीचे पॅकेज अद्याप काँग्रेसने मंजुरी न दिल्याने प्रलंबित आहे, तर दुसरीकडे युक्रेनला आश्वासित केलेली बहुतेक शस्त्रे आणि इतर मदत 2024च्या अखेरीपर्यंत पोहोचणार नाही, हे युरोपियन नेतेच कबूल करत आहेत.

(अनुवाद : आराधना जोशी)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here