पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक येथून अलीकडेच सैन्य माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भारत आणि चीनने यांच्यात गुरुवारी राजनैतिक पातळीवर चर्चा झाली. सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरातच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.भारत-चीन सीमा व्यवहारांवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत यंत्रणेच्या (डब्ल्यूएमसीसी) 32व्या बैठकीत ही चर्चा झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पूर्व आशियाचे संयुक्त सचिव गौरंगलाल दास यांनी केले, तर चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाचे महासंचालक होंग लियांग यांनी केले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) एका निवेदनात नमूद केले की दोन्ही देशांनी 2020 पासून उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या सर्वात अलीकडील सैन्य माघार कराराच्या अंमलबजावणीस सकारात्मक दुजोरा दिला. 23 ऑक्टोबर 2024 रोजी कझान येथे झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बोलावलेल्या विशेष प्रतिनिधींच्या पुढील बैठकीसाठी दोन्ही शिष्टमंडळांनी यानिमित्ताने पायाभरणी केली.
दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळांनी सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी 2020 च्या संघर्षातून शिकलेल्या धड्यांबाबत विचार केला, असे निवेदनात अधोरेखित करण्यात आले. प्रस्थापित यंत्रणांद्वारे नियमित राजनैतिक आणि लष्करी पातळीवर देवाणघेवाण राखण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला.
याशिवाय, दोन्ही शिष्टमंडळांनी सीमांचे प्रभावी व्यवस्थापन आणि द्विपक्षीय करार, शिष्टाचार आणि परस्पर सामंजस्यानुसार शांतता राखण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान चिनी शिष्टमंडळाच्या नेत्याने भारताच्या परराष्ट्र सचिवांचीही भेट घेतली.
त्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी तणाव कमी करण्यासाठी आणि सुधारित संबंधांच्या दृष्टीने पुढील टप्प्यांची रूपरेषा तयार करण्यासाठी पुन्हा संवाद सुरू करतील यावर सहमती झाली होती. मात्र भारत-चीन संबंध “सामान्य” करण्याच्या दिशेने टाकलेले हे केवळ एक प्रारंभिक पाऊल आहे याबद्दल अभ्यासकांचे एकमत आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैन्यांमधील हिंसक संघर्ष किंवा चकमकी रोखणे हा या प्रयत्नाचा उद्देश आहे. अत्यंत संथ गतीने ही प्रक्रिया पार पडेल या स्वरूपाचे संकेत देत, “आम्हाला आणखी थोडा वेळ थांबावे लागेल,” अशी प्रतिक्रिया संरक्षणमंत्र्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे.
टीम भारतशक्ती