संभाव्य धोक्यांचा प्रतिबंध करणे आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्याची भारताची क्षमता आणखी वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वापूर्ण पाऊल टाकत भारतीय नौदलाने 29 ऑगस्ट रोजी ‘आयएनएस अरिघात’ ही अरिहंत वर्गातील दुसरी पाणबुडी सेवेत समाविष्ट केली. आयएनएसस अरिघात ही आयएनएस अरिहंतप्रमाणेच एक बॅलेस्टिक मिसाईल सबमरीन आहे. 6 हजार टन वजन आणि 112 मीटर लांब ही पाणबुडी आपल्यासोबत के – 15 सागरी मिसाईल वाहून नेऊ शकतात. या मिसाईलची रेंज 750 किलोमीटर आहे. विशाखापट्टणम् येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही हा समारंभ पार पडला.
संरक्षण मंत्रालयाने एक्सवर एका पोस्टमध्ये जाहीर केले की दुसरी अरिहंत-श्रेणीची पाणबुडी, आयएनएस अरिघाट, विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सैनिकांना उच्च दर्जाची शस्त्रे आणि व्यासपीठांनी सुसज्ज करण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहे.
Second Arihant-Class submarine ‘INS Arighaat’ commissioned into Indian Navy in the presence of Raksha Mantri Shri @rajnathsingh in Visakhapatnam.
PM Modi-led Govt is working on mission mode to equip soldiers with top-quality weapons & platforms: RMhttps://t.co/yV0NDIKYmV pic.twitter.com/KZ8MFgQlyc
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) August 29, 2024
“अरिघात’ ही पाणबुडी भारताची आण्विक त्रिसूत्री आणखी बळकट करेल, आण्विक प्रतिबंधक क्षमता वाढवेल, या क्षेत्रात धोरणात्मक समतोल आणि शांतता प्रस्थापित करण्यात मदत करेल आणि देशाच्या सुरक्षेत निर्णायक भूमिका बजावेल,” असा आत्मविश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात व्यक्त केला. ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत रुजू होणे म्हणजे देशासाठी मिळवलेले फार मोठे यश आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अविचल निर्धाराचा पुरावा आहे असे ते म्हणाले.
हे यश साध्य करण्यात भारतीय नौदल, डीआरडीओ आणि उद्योग क्षेत्राने केलेले कठोर परिश्रम आणि समन्वयाची केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. हे स्वावलंबन म्हणजे स्वयंसामर्थ्याचा पाया आहे असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून, देशातील उद्योग क्षेत्राला, विशेषतः एमएसएमई उद्योगांना मोठी चालना मिळाली असून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण झाल्या आहेत या वास्तवाची त्यांनी प्रशंसा केली.
भारताला आण्विक शस्त्रास्रांनी सुसज्ज देश बनवण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या राजकीय इच्छाशक्तीचे स्मरण करून संरक्षणमंत्री म्हणाले, “आज, भारत विकसित देश बनण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे.विशेषतः, सध्याच्या भू-राजकीय परिदृश्यात आपल्याला संरक्षण क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात जलदगतीने विकास साधणे अत्यावश्यक आहे. आर्थिक समृद्धतेसोबतच आपल्याला मजबूत सैन्य देखील हवे आहे. आपल्या सैनिकांकडे सर्वोत्कृष्ट दर्जाची शस्त्रे आणि भारताच्या भूमीत तयार केलेले मंच वापरायला मिळतील याची सुनिश्चिती करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे.”
आयएनएस अरिघात या पाणबुडीच्या बांधणीत प्रगत संरचना आणि उत्पादन तंत्रज्ञान, तपशीलवार संशोधन आणि विकास, विशेष साहित्याचा वापर, जटील अभियांत्रिकी रचना आणि अत्युच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला आहे. या पाणबुडीच्या उभारणीत वापरण्यात आलेल्या स्वदेशी यंत्रणा आणि उपकरणे भारतीय शास्त्रज्ञ, उद्योग विश्वातील तज्ञ आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संकल्पना, संरचना वापरून उत्पादन आणि एकत्रीकरण प्रक्रिया करुन तयार केल्या आहेत हे या प्रकल्पाचे वेगळेपण आहे, असे संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या पाणबुडीच्या उभारणीसाठी स्वदेशी पद्धतीने केलेली तंत्रज्ञानविषयक प्रगती या पाणबुडीला तिच्या अरिहंत या पूर्ववर्ती पाणबुडीपेक्षा लक्षणीयरित्या अधिक प्रगत बनवते. भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या दोन्ही पाणबुड्यांची उपस्थिती संभाव्य धोक्यांचा प्रतिबंध करण्याची आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्याची भारताची क्षमता आणखी वाढवेल, असा विश्वासही या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
टीम भारतशक्ती