पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या बलुचिस्तान प्रांतातील हिंसाचारात झालेली वाढ ही अचानक नसून प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून तिथल्या हिंसाचारात सातत्य दिसून येत असल्याचे दिल्लीतील इंडिया फाऊंडेशन थिंकटँकचे संचालक कमांडर आलोक बन्सल म्हणाले.
चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचे (सीपीईसी) प्रमुख केंद्र असण्याव्यतिरिक्त, वायू आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी ते स्ट्रॅटन्यूज ग्लोबलच्या ‘द गिस्ट’ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
“बलुचिस्तानमध्ये 23 – 24 ऑगस्टच्या रात्रीपासून हिंसाचाराला सुरूवात झाली. 24 ते 26 ऑगस्ट या काळात रात्रीच्यावेळी – म्हणजे 2006 मध्ये पाकिस्तानी सैन्याने ठार केलेल्या नवाब अकबर बुगती यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी – हिंसाचाराने कळस गाठला”, असे बन्सल यांनी स्पष्ट केले.
“हे हल्ले अक्षरशः संपूर्ण बलुचिस्तानपर्यंत पसरले होते. वसाहतवादी काळातील एक रेल्वे पूल बोलानमध्ये उडवून देण्यात आला, ज्यामुळे क्वेटा ते सिंध आणि पंजाबपर्यंतची रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती.”
इराणला जोडणारा आणखी एक रेल्वे मार्ग उडवला गेला, पोलिस ठाणी आणि लेव्हीजवर (स्थानिक पातळीवर भरती केलेल्या निमलष्करी दलांवर) बलुच बंडखोरांनी हल्ले करून बरीच शस्त्रास्त्रे लुटून नेली.
पंजाबी नागरिकांना ठार करण्यासाठी झालेला हल्ला हा यातील कदाचित सर्वात मोठा हल्ला होता. 23 जणांना बस आणि ट्रकमधून उतरवण्यात आले, त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या काळात एकूण 73 नागरिकांचा मृत्यू झाला.
“कर्तव्यावर पुन्हा रुजू होण्यासाठी परत येत असलेल्या सुरक्षा कर्मचारी किंवा नौदलाच्या जवानांना खाली खेचून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले अशाही अनेक घटना घडल्या आहेत”, असे बन्सल म्हणाले, “बलुचिस्तानच्या संपूर्ण भागात त्या एका रात्री अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. त्यासाठी हे हल्ले लक्षणीय आहेत.”
त्याशिवाय, 73 नागरिकांना ठार मारणे हा बलुच धोरणातील एक महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून रस्ते जोडणी, रेल्वे जोडणी, पाईपलाईन, वीज वाहिन्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, जेणेकरून सुरक्षा दलांना त्यांच्या तळांपासून दूर सहजपणे जाऊन काम करता येणे शक्य होणार नाही. बलुचिस्तानला उर्वरित पाकिस्तानपासून शब्दशः वेगळे करणे ही कल्पना या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमागे होती.
संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी –
सूर्या गंगाधरन