चीनमधील बांधकाम व्यवसायिक एकीकडे कमी घरे आणि पूल उभारत असताना, चीनचे नागरिक स्वस्त, कमी पोषणमूल्ये असलेले अन्न (फास्ट फूड) विकत घेत असताना, कारखाने आणि शेते स्वयंचलित उपकरणांमध्ये गुंतवणूक करत असताना, एका नवीनच आर्थिक आव्हानाला चीन सामोरा जात आहे. देशात लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढू लागले असून आरोग्यसेवेच्या खर्चात त्यामुळे भर पडण्याची शक्यता आहे.
डॉक्टर आणि संशोधकांच्या म्हणण्यानुसार नोकरीच्या ठिकाणी असणारा ताण, कामाचे प्रदीर्घ तास आणि कुपोषणाला आमंत्रण देणारा आहार हे घटक शहरांमधील आरोग्यविषयक उच्च जोखीम वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, तर ग्रामीण भागात शेतीच्या कामांसाठीची शारीरिक मागणी कमी होत आहे तर वजनाशी संबंधित समस्यांवर अपुऱ्या आरोग्यसेवेमुळे योग्य तपासण्या आणि उपचार होणे अवघड बनत आहे.
चीन सध्या अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत आहे ज्या त्याच्या वजनवाढीच्या समस्येला कारणीभूत आहेत. तंत्रज्ञानाच्या, नाविन्यपूर्णतेवर आधारलेल्या आधुनिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, अधिकाधिक नोकऱ्या एका जागी बसून करायच्या किंवा डेस्क-बाउंड झाल्या आहेत. तर दुसरीकडे महागाईमुळे प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या मंदीने नागरिकांना स्वस्त, अस्वास्थ्यकर आहार स्वीकारण्यास भाग पाडले आहे.
याशिवाय गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा आधीच मुबलक असल्याने, अलिकडच्या वर्षांत लाखो कामगारांनी बांधकाम आणि उत्पादनाशी संबंधित नोकऱ्यांमधून राइड शेअरिंग किंवा वितरण कंपन्यांसाठी वाहन चालवणारे वाहक बनले आहेत.
मंदीच्या काळात, अनेकदा नागरिक स्वस्त जेवण पसंत करतात, जे आरोग्यासाठी घातक असू शकते. पालकांनी मुलांसाठी असणारे पोहणे किंवा इतर क्रीडाप्रकार बंद केले आहेत. डॅक्स्यू कन्सल्टिंगच्या म्हणण्यानुसार, चीनची फास्ट फूड बाजारपेठ 2017 मधील 892 अब्ज युआनवरून 2025 मध्ये 1.8 ट्रिलियन युआन (253.85 अब्ज अमेरिकन डॉलर्स) पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
“आर्थिक मंदीमुळे अनेकदा लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल होतात”, असे परराष्ट्र संबंध परिषदेतील जागतिक आरोग्याचे वरिष्ठ सहकारी यानझोंग हुआंग म्हणाले. “आहाराच्या सवयी अनियमित होऊ शकतात. त्यासोबतच सामाजिक क्रियाशीलताही कमी होऊ शकते.”
“दैनंदिन दिनचर्येतील हे बदल लठ्ठपणाच्या वाढत्या समस्यांमध्ये आणि परिणामी मधुमेहात योगदान देऊ शकतात”, “असे ते म्हणाले. लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढतच राहील आणि आरोग्य यंत्रणेवर ओझे बनेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
जुलैमध्ये, नॅशनल हेल्थ कमिशनचे (NHC) वरिष्ठ अधिकारी गुओ यानहोंग म्हणाले की लठ्ठ आणि जास्त वजन असलेले लोक “सार्वजनिक आरोग्याची एक मोठी समस्या” बनतात.
एनएचसीने या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांवर प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.
शिन्हुआ या चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने त्याच महिन्यात दिलेल्या बातमीनुसार देशातील निम्म्याहून अधिक प्रौढ जनता लठ्ठ किंवा जास्त वजनाची आहे. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेल्या 37 टक्के अंदाजापेक्षा जास्त आहे.
बीएमसी पब्लिक हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, वजनाशी संबंधित उपचारांचा खर्च 2022 मधील 8 टक्क्यांवरून 2030 पर्यंत आरोग्य अर्थसंकल्पाच्या 22 टक्के किंवा 418 अब्ज युआनपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. हा अंदाज “पूर्णतः अंदाजित” होता आणि त्यात आरोग्यसेवेच्या खर्चातील वाढ विचारात घेतली गेली नाही, असे त्या बातमीत म्हटले आहे.
यामुळे कर्जबाजारी स्थानिक सरकारांवरचा ताण आणखी वाढेल आणि विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उत्पादक क्षेत्रांमध्ये साधने निर्देशित करण्याची चीनची क्षमता कमी होईल.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्स)