युरोपियन महासंघ आयोगाच्या सदस्यपदाचा फ्रान्सचे थिएरी ब्रेटन यांनी सोमवारी राजीनामा दिला. युरोपियन महासंघाच्या पुढील कार्यकारी मंडळासाठी ते यापुढे त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करणार नाहीत. अत्यंत राजकीय घडामोडींना हे एक अनपेक्षित वळण मिळाले आहे.
ब्रेटन यांनी एक्सवर आपला राजीनामा जाहीर केला. आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन पुढील पाच वर्षांसाठी नव्याने बनणाऱ्या त्यांच्या संघात कोणाकोणाचा समावेश करायचा हे या आठवड्यात जाहीर करण्याची तयारी करत आहेत. मात्र ब्रेटन यांनी वॉन डेर लेयेन यांचे “प्रशासन संशयास्पद” पद्धतीने कार्यरत असल्याचा आरोप करत राजीनामा दिला.
ब्रेटन यांच्या राजीनाम्याच्या काही तासांनंतर, फ्रान्सने परराष्ट्रमंत्री स्टीफन सेजोर्न यांना युरोपियन महासंघाच्या कार्यकारी मंडळाचे नवे उमेदवार म्हणून नियुक्त केले. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने हे स्पष्ट केले की ते फ्रान्ससाठी औद्योगिक सार्वभौमत्व आणि युरोपियन स्पर्धात्मकतेवर केंद्रित एक महत्त्वाचा पोर्टफोलिओ मिळविण्यासाठी इच्छुक आहेत.
ब्रेटन हे गेल्या पाच वर्षांपासून युरोपियन आयोगाच्या सर्वोच्च सदस्यांपैकी एक होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश एलन मस्क यांच्याशी सार्वजनिकरित्या वाद घालण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. 27 देशांच्या युरोपियन महासंघाचे बिग टेक नियमन, त्याचा कोविड-लस प्रतिसाद आणि संरक्षण उद्योगांना चालना देण्याच्या प्रयत्नांना आकार देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जबरदस्तीने राजीनामा?
आपल्या राजीनाम्याच्या पत्रात, ब्रेटन यांनी असा आरोप केला आहे की “काही दिवसांपूर्वी” वॉन डेर लेयन यांनी “कथितरित्या अधिक प्रभावशाली पोर्टफोलिओ”च्या बदल्यात “वैयक्तिक कारणास्तव” आयोगातून आपले नाव मागे घेण्यास फ्रान्सला सांगितले होते.
“या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर – शंकास्पद कारभाराचे दिसणारे पुढील चित्र – मला असा निष्कर्ष काढावा लागत आहे की मी यापुढे महासंघात माझी कर्तव्ये पार पाडू शकत नाही,” असे ब्रेटन यांनी पत्रात म्हटले आहे.
रॉयटर्सला या आरोपाची शहानिशा करता आली नाही. वॉन डेर लेयन यांच्या कार्यालयाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
माजी फ्रेंच मंत्री आणि व्यवसाय कार्यकारी अधिकारी असणारे ब्रेटन वॉन डेर लेयन यांच्या पहिल्या कार्यकाळात युरोपियन महासंघाच्या उद्योग आणि अंतर्गत बाजार आयुक्त होते. संपूर्ण युरोपमध्ये 5G आणि जलद-स्पीड ब्रॉडबँडच्या रोलआउटसाठी बिग टेक कंपन्यांकडून निधी मिळविण्यासाठी दूरसंचार क्षेत्राच्या प्रयत्नाला त्यांनी पाठिंबा दिला होता.
अलीकडच्या काही महिन्यांत मात्र त्यांचे आणि वॉन डेर लेयेन यांचे संबंध बिघडले होते. फ्रेंच आयुक्त, एक उदारमतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेटन यांनी दुसऱ्या कार्यकाळासाठी आयोगाचे नेतृत्व करण्यासाठी युरोपियन पुराणमतवादी ईपीपी पक्षाच्या उमेदवार म्हणून वॉन डेर लेयेन यांच्या नामांकनावर जाहीरपणे टीका केल्याने त्या संतप्त झाल्या होत्या, असे युरोपियन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
मस्क यांच्यासोबत ब्रेटन यांच्या सार्वजनिक भांडणांमुळे आयोगाच्या इतर सहकाऱ्यांमध्येही निराशा पसरली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तरीसुद्धा, ताज्या घडामोडींनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, वॉन डेर लेयेन यांनी ब्रेटन यांची पुन्हा नियुक्ती करणे अपेक्षित होते.
या संपूर्ण प्रकरणाकडे युरोपियन महासंघाचे दोन सर्वात मोठे दिग्गज, वॉन डेर लेयेन यांचा मूळ देश जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील एक पॉवर प्ले म्हणून देखील पाहिले जाऊ शकते. कारण सध्या मॅक्रॉन यांची आपल्याच देशावरची पकड कमी झाल्याचे चित्र आहे.
जूनमध्ये होणाऱ्या युरोपीय संसदेच्या निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या नवीन आयोगाच्या संघात युरोपीय महासंघाचा दुसरा सर्वात मोठा सदस्य देश म्हणून फ्रान्स प्रमुख पदासाठी इच्छुक आहे. युरोपियन महासंघाच्या विविध संस्थांमधील प्रमुख समित्यांमध्ये दर पाच वर्षांनी बदल केला जातो. या बदलाचा संपूर्ण गटाच्या धोरण निर्मितीवर मोठा परिणाम होतो.
युरोपियन महासंघातील प्रत्येक सदस्य देशाला आयोगामध्ये काहीना काही जबाबदारी मिळत असली, तरी त्या देशाला मिळालेल्या पोर्टफोलिओनुसार त्याचे राजकीय वजन आणि महत्त्व मोठ्या प्रमाणात बदलते.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)