इस्रायलकडून बैरुतवर झालेल्या हल्ल्यात आपले तीन नेते मारले गेल्याचे पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने सोमवारी सांगितले. इस्रायलने या प्रदेशातील इराणच्या मित्रराष्ट्रांविरुद्ध उघड उघड शत्रुत्व दाखवायला सुरूवात केली असून शहराच्या हद्दीतील हा पहिलाच हल्ला आहे.
पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनने (पीएफएलपी) सांगितले की बैरुतच्या कोला जिल्ह्याला लक्ष्य करून झालेल्या हल्ल्यात त्यांचे तीन नेते मारले गेले.
बैरुतच्या कोला जिल्ह्यातील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर हा हल्ला झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी रॉयटर्सला सांगितले.
इस्रायली सैन्याकडून मात्र या हल्ल्यांबाबत कोणतीही त्वरित प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
हल्ल्यांची वारंवारिता वाढली
लेबनॉनमधील हिजबुल्लाह नागरी सेना आणि येमेनमधील हौथी नागरी सेनेच्या विरोधात इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांच्या वारंवारतेमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष नियंत्रणाबाहेर जावून इराण तसेच इस्रायलचा मुख्य सहकारी असलेला अमेरिका यात ओढले जाऊ शकतात अशी भीती निर्माण झाली आहे.
पीएफएलपी हा इस्रायलविरुद्धच्या संघर्षात भाग घेणारा आणखी एक दहशतवादी गट आहे.
याआधी हिजबुल्लाहच्या नेत्याला ठार मारल्यानंतर इस्रायलने रविवारी येमेनमधील हौथी नागरी सेनाआणि संपूर्ण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या डझनभर ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
येमेनच्या होदेइदा बंदरावर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान चार जण ठार तर 29 जण जखमी झाल्याचे हौथी संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हे हल्ले म्हणजे हौथी क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. लेबनॉनमध्ये, अधिकाऱ्यांनी सांगितले की रविवारी इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान 105 लोक मारले गेले.
हजारांहून अधिक मृत्यूमुखी
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गेल्या दोन आठवड्यांत हजारांहून अधिक लेबनी लोक मारले गेले असून 6 हजार जखमी झाले, त्यातले नागरिक किती होते याचा मात्र कुठेही उल्लेख केलेला नाही. दहा लाख नागरिक- एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश- त्यांची घरे सोडून पळून गेल्याचे सरकारने सांगितले आहे.
दोन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या इस्रायली हल्लांमध्ये हिजबुल्लाचा नेता सय्यद हसन नरसल्लाहसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलने हल्ला सुरूच ठेवण्याचे वचन दिले आहे आणि हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्यातून पळून जाण्यास भाग पाडल्या गेलेल्या रहिवाशांसाठी आपला उत्तरेकडील भाग पुन्हा सुरक्षित करू इच्छित असल्याचे म्हटले आहे.
इस्रायली ड्रोन बैरूतवर रात्रभर आणि रविवारी बराच वेळ घिरट्या घालत होते. याशिवाय लेबनॉनच्या राजधानीभोवती नवीन हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू येत होते. निर्वासित कुटुंबांनी बैरुतच्या झैतुनय बे समुद्रकिनाऱ्यावरील रेस्टॉरंट्स आणि कॅफेच्या बाकांवर बसून रात्र घालवली.
बैरुतमधील हल्ले
इस्रायलचे बरेच हल्ले लेबनॉनच्या दक्षिणेस झाले आहेत – जिथे इराण समर्थित हिजबुल्लाच्या बऱ्याचशा कारवाया होतात – किंवा बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात. कोला जिल्ह्यातील सोमवारी झालेला हल्ला हा बैरुत शहराच्या हद्दीतील पहिला हल्ला असल्याचे दिसून आले. इस्रायली बॉम्बस्फोटातून पळून गेलेले दक्षिण लेबनॉनमध्ये राहणारे सिरियन लोक शेजारच्या एका पुलाखाली कित्येक दिवस झोपले होते, असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
अमेरिकेने लेबनॉनमधील संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे, मात्र वाढत्या संघर्षाचा विचार करून आपले सैन्य या प्रदेशात हजर असेल याचीही काळजी घेतली आहे.
मध्यपूर्वेतील संपूर्ण युद्ध टाळता येईल का, असे विचारले असता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, “ते व्हायलाच हवे”. ते म्हणाले की ते इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी आपण बोलणार आहोत.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)