म्यानमार गृहयुद्धामुळे प्रादेशिक अंमली पदार्थांच्या तस्करीला चालना मिळाली आहे. म्यानमारमधून शेजारच्या थायलंडमध्ये अवैध अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून मेथामफेटामाइन्स आणि हेरॉईन जप्तीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे एका वरिष्ठ थाई अंमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ (ओएनसीबी) कार्यालयाचे उप-सरचिटणीस अपिकित च रोजप्रासेर्ट म्हणाले की, मुख्यतः उत्तरेकडील प्रदेशातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी होते. अमली पदार्थ विक्रेते पर्वतांमधून किंवा मेकोंग नदीवर जाऊन मेथाम्फेटामाइन गोळ्या आणि क्रिस्टल मेंथ आणतात, ज्याला ते बर्फ देखील म्हणतात.
थाई अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संघटित गुन्हेगारी गटांनी म्यानमारच्या शान आणि काचिन राज्यांमध्ये “सुपर लॅब” स्थापन करण्यासाठी नागरी सेना आणि बंडखोर गटांशी युती केली आहे.
म्यानमारकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
जुंट्याच्या प्रवक्त्याने या बातमीवर भाष्य करण्यास नकार दिला मात्र म्यानमारच्या सत्ताधारी जुंटाने यापूर्वी म्हटले आहे की ते अंमली पदार्थांचा सामना करण्यासाठी शेजारील देशांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहेत.
“सशस्त्र संघर्षामुळे, अंमली पदार्थांचा व्यापार हा शस्त्र खरेदीसाठी निधी पुरवण्यासाठी किंवा लढाऊ सैन्याला चालना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक आहे”, असे अपिकित यांनी एका मुलाखतीत रॉयटर्सला सांगितले.
“अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित गुन्ह्यांबाबत आपण सतर्क राहिले पाहिजे आणि शेजारील देशांसोबत काम केले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
म्यानमार गृहयुद्धात अडकला आहे, अनेक आघाड्यांवर सैन्य लढत आहे आणि अनेक वांशिक अल्पसंख्याक बंडखोर गटांशी सुरू असलेल्या सशस्त्र प्रतिकार चळवळीमुळे आपला प्रदेश गमावला आहे. लष्कराने 2021 मध्ये म्यानमार सरकार बरखास्त करत म्यानमार आपल्या ताब्यात घेतले.
अंमली पदार्थ जप्त
या वर्षाच्या पहिल्या साडेआठ महिन्यांत थायलंडच्या चियांग माई, चियांग राय आणि माई हाँग सन या उत्तरेकडील प्रांतांमध्ये मेंथ गोळ्या जप्त करण्याचे प्रमाण 2023 मध्ये जप्त केलेल्या 346 दशलक्ष गोळ्यांपेक्षा 172 टक्क्यांनी वाढले आहे, असे ओएनसीबीच्या अहवालातून बघायला मिळते.
त्याच प्रांतांमध्ये क्रिस्टल मेंथची जप्ती साधारणपणे याच कालावधीत 39 टक्क्यांनी वाढून 6.48 टन झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यावर्षी 327 किलो (721 पौंड) हेरॉईन देखील जप्त करण्यात आले जे 2023 मध्ये जप्त केलेल्या हेरॉईनच्या जवळजवळ सातपट आहे.
किंमतीत घसरण
युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइमच्या म्हणण्यानुसार, म्यानमारमधील राजकीय अशांततेमुळे कृत्रिम अंमली पदार्थांचे उत्पादन तसेच तस्करीमध्ये वाढ आणि विस्तार झाला आहे. याशिवाय अफूची पुनर्लागवड सुरू झाली आहे.
अंमली पदार्थांच्या जप्तीमध्ये वाढ झाली असली तरी, थायलंडमध्ये मेंथ गोळ्यांच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. जप्तीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात हे अंमली पदार्थ अधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटतात, असे अपिकित म्हणाले.
ते म्हणाले की, थायलंडमध्ये सध्या मेंथ टॅब्लेटची सरासरी किंमत सुमारे 25-30 बाहट (0.78 ते 0.93 अमेरिकन डॉलर) आहे. 2017 मध्ये त्याची किंमत 80 बाहट (2.49 अमेरिकन डॉलर) होती तर 2013 मध्ये ती 200 बाहट (6.21 अमेरिकन डॉलर) होती.
जुंटाचा सहभाग?
उत्तर सीमेवरील थायलंडच्या अंमली पदार्थ दमन गटाचे कमांडर जनरल नरीत थानवोर्नवोंग यांनी रॉयटर्सला सांगितले की त्यांच्या कृती दलाला असे वाटते की 5 कोटींहून अधिक मेंथ गोळ्या थायलंडमध्ये तस्करीच्या प्रतीक्षेत आहेत.
म्यानमारच्या सरकारशी लढणारे केवळ काही सशस्त्र गट अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी होते, तर संघर्षात सहभागी नसलेल्या इतर संघटना उत्पादन आणि व्यापारात सहभागी होत्या, असे ते म्हणाले.
ओएनसीबीच्या आकडेवारीनुसार, म्यानमारमधील 2021 च्या सत्तापालटानंतर तीन उत्तर थाई प्रांतांमध्ये अंमली पदार्थांची जप्ती वाढली आहे, ज्यामध्ये क्रिस्टल मेंथमध्ये 284 टक्के, एम्फेटामाइन टॅब्लेटमध्ये 201 टक्के आणि हेरॉईनमध्ये 77 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)