कराची विमानतळाच्या गजबजलेल्या परिसरात झालेल्या भीषण स्फोटात दोन चिनी कामगारांचा मृत्यू झाला असून आठजण जखमी झाल्याच्या वृत्ताला चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. टँकरमध्ये झालेल्या या शक्तिशाली स्फोटामुळे पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या विमानतळ परिसरात खळबळ उडाली.
हा स्फोट रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता झाला. देशाच्या दक्षिण सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराची येथील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.त्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आणखी एक चिनी व्यक्ती जखमी झाली, असे चिनी दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी व्यक्तीही या स्फोटात जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या फुटीरतावादी दहशतवादी गटाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी कराची विमानतळावरून येणाऱ्या चिनी अभियंते आणि गुंतवणूकदारांच्या उच्चस्तरीय ताफ्याला लक्ष्य केले होते. प्रसारमाध्यमांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या या निवेदनात, बीएलएने दावा केला आहे की हा स्फोट त्यांनी इंजिनीअर्ससह चिनी नागरिकांना लक्ष्य करत वाहनातून चालवण्यात आलेल्या सुधारित स्फोटक यंत्राचा वापर करून केलेला हल्ला होता.
दक्षिण सिंध प्रांताच्या राज्य सरकारने सोशल मीडिया साइट एक्सवर सांगितले की विमानतळ मोटरवेवर एका टँकरचा स्फोट झाला.
चीनने या स्फोटाला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे आणि याच्या तपासासाठी आपण पाकिस्तानसोबत काम करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी चीनने सखोल चौकशीची मागणी केली असून देशातील चिनी नागरिकांना सुरक्षेची खबरदारी घेण्याची पाकिस्तानला आठवण करून दिली.
“पाकिस्तानमधील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावास या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करत असून, दोन्ही देशांच्या पीडितांबद्दल तीव्र शोक व्यक्त करतात. तसेच यात जखमी झालेल्या आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतात,” असे निवेदनात म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, या घटनेच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी चीन पाकिस्तानला सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
पाकिस्तानातील चिनी नागरिक, संस्था आणि प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानच्या बाजूने एकाच वेळी व्यावहारिक तसेच प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत यावर दूतावासाने भर दिला.
“पाकिस्तानमधील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावास पाकिस्तानमधील चिनी नागरिकांना आणि कंपन्यांना सतर्क राहण्याची, स्थानिक सुरक्षा परिस्थितीवर बारकाईने लक्ष देण्याची, सुरक्षा उपाययोजना बळकट करण्याची आणि सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आठवण करून देत आहे,” असेही निवेदनात म्हटले आहे.
बीएलएने चिनी हितसंबंधांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे, विशेषतः अरबी समुद्रावरील ग्वादर या मोक्याच्या बंदरावर. ते बीजिंगवर प्रांताचे शोषण करण्यात इस्लामाबादला मदत केल्याचा आरोप करतात. याशिवाय या प्रदेशात काम करणाऱ्या चिनी नागरिकांना लक्ष्य करणे, कराचीमधील बीजिंगच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला करणे इतके ते पुढे गेले आहेत. दक्षिण आणि मध्य आशियाला चीनच्या राजधानीशी जोडणाऱ्या बीजिंगच्या कोट्यवधी डॉलर्सच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सक्रियपणे सहभागी होणारे हजारो चिनी कामगार सध्या पाकिस्तानात आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)