भारतीय लष्कराने सोमवारी आपला पहिला सुधारित टी-90 ‘भीष्म’ रणगाडा तयार करत आपल्या चिलखती तुकड्यांची परिचालन सज्जता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या प्रकरणाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुरुस्तीच्या प्रक्रियेत तळापासून रणगाडा पूर्णपणे उघडणे आणि त्याची पुनर्बांधणी करणे या गोष्टी समाविष्ट होत्या. आपली ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, “200 पेक्षा जास्त असेंब्ली आणि सब-असेंबली काळजीपूर्वक काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर अचूक मशीनिंग आणि रीसेटिंग तंत्रांचा वापर करून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली.”
चेन्नईजवळील अवाडी येथील अवजड वाहन कारखान्यात (HVF) रशियाच्या लायसन्सवर तयार करण्यात आलेल्या टी-90 रणगाड्यांच्या रोलआउट समारंभाला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते. लष्कराने 1 हजार 657 टी-90 रणगाडे मागवले आहेत. सध्या सुमारे 1 हजार 300 रणगाडे कार्यरत आहेत. सुरुवातीच्या बॅचमधील रणगाड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील ५०५ आर्मी बेस वर्कशॉपमधील कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्सने (ईएमई) रशियन मूळच्या टी-90 मुख्य युद्ध रणगाड्याचे यशस्वीपणे आधुनिकीकरण केले आहे. हा रणगाडा त्याच्या फायर पॉवर, गतिशीलता आणि संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
मूळ उपकरण निर्मात्याने पुरवलेल्या सानुकूलित (customized) मशीन्स आणि टेस्ट बेंचचा वापर करून, बेस वर्कशॉपमधील तंत्रज्ञांनी टी-90 च्या यांत्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि इंस्ट्रुमेंटल घटकांची स्वतंत्रपणे पुनर्बांधणी आणि चाचणी करून त्यांचे तांत्रिक कौशल्य दाखवून दिले आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की यामुळे सर्व-भूप्रदेश कामगिऱ्यांसाठी रणगाड्यांची तयारी निश्चित झाली असून त्याला एक नवीन जीवन देण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या “परिवर्तनाच्या दशकात” लष्कर आपल्या तांत्रिक क्षमतांमध्ये प्रगती करत असताना, रणगाड्यांची ही यशस्वी दुरुस्ती महत्त्वपूर्ण लढाऊ प्लॅटफॉर्मची देखभाल आणि त्यात वाढ करण्याची स्वदेशी क्षमता दर्शवते, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पर्वतरांगांमध्ये जलद तैनाती आणि उच्च चलनवलनासाठी तयार करण्यात आलेला भारताचा नवा हलका रणगाडा झोरावरची बीकानेरजवळच्या महाजन फायरिंग रेंजमध्ये नुकतीच पहिली चाचणी घेण्यात आली.त्यानंतर अलीकडे झालेली प्रगती म्हणजे टी – 90 मध्ये करण्यात आलेला बदल. लष्कराच्या 354 हलक्या रणगाड्यांची गरज पूर्ण करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि लार्सन अँड टुब्रो (एल ॲन्ड टी) यांनी संयुक्तपणे झोरावर प्रकल्पांतर्गत 25 टन वजनाचा हा रणगाडा विकसित केला आहे. डिझाइन तयार झाल्यानंतर केवळ दोन वर्षांत हा रणगाडा विकसित करण्यात आला आहे.
आगामी चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्र चाचणीचा समावेश असेल. व्यापक वापर चाचणीसाठी लष्कराला रणगाडा सुपूर्द करण्यापूर्वी डीआरडीओने जानेवारी 2025 पर्यंत विविध चाचण्या पूर्ण करणे अपेक्षित आहे. या चाचण्या पूर्ण करण्यासाठी एकंदर 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे, कारण सैन्यात रणगाड्यांचा प्रवेश होण्यापूर्वी उन्हाळा, हिवाळा आणि टोकाच्या परिस्थितीमध्ये रणगाड्याच्या कामगिरीचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. हा रणगाडा 2027 पर्यंत लष्कराच्या सेवेत रुजू होण्यासाठी तयार होईल अशी अपेक्षा आहे.