इस्रायलविरूद्धचे युद्ध नव्या आणि अधिक तीव्र स्वरूपाच्या टप्प्याकडे जात असल्याचे संकेत लेबनॉनच्या हिजबुल्लाह या अतिरेकी गटाने शुक्रवारी दिले. तर इराणने हमास नेता याह्या सिनवारच्या हत्येनंतर “प्रतिशोधाची भावना अधिक बळकट होईल” असे म्हटले आहे.
7 ऑक्टोबर, 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या आणि गाझा युद्धाला चालना देणाऱ्या हल्ल्याचा मास्टरमाईंड सिनवार बुधवारी पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये इस्त्रायली सैनिकांनी केलेल्या कारवाईदरम्यान मारला गेला. वर्षभर चाललेल्या संघर्षातील ही आणखी एक महत्त्वाची घटना आहे.
पाश्चिमात्य नेत्यांनी सांगितले की सिनवरच्या मृत्यूमुळे संघर्ष संपवण्याची संधी मिळाली आहे. मात्र हमासच्या अतिरेक्यांनी पकडलेले ओलीस परत येईपर्यंत युद्ध चालूच राहील असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
“आज आम्ही स्कोअर सेटल केला आहे. आज कुकर्मींना मोठा धक्का बसला आहे मात्र आमचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही,” असे गुरुवारी सिनवरच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा मिळाल्यानंतर नेतन्याहू यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ निवेदनात सांगितले.
“प्रिय ओलिसांच्या कुटुंबियांनो, मी म्हणतो: युद्धातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. तुमचे सर्व प्रियजन, आमचे प्रियजन, घरी येईपर्यंत आम्ही पूर्ण ताकदीने युद्ध सुरू ठेवू.”
सिनवारचा मृत्यू
जुलैमध्ये तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनीयेह याच्या हत्येनंतर हमासचा प्रमुख नेता म्हणून सिनवारचे नाव घेतले जात होते. गेल्या दोन दशकांत हमासने गाझात जमिनींखाली बांधलेल्या बोगद्यांच्या दाट जाळ्यांमध्ये सिनवर लपल्याचे मानले जात होते.
इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी दक्षिण गाझा येथे तोफांचा मारा करत इस्रायली सैन्याने सिनवरला यमसदनी धाडले. सैन्याला सुरुवातीला हे माहीत नव्हते की त्यांनी आपल्या देशाच्या पहिल्या क्रमांकाच्या शत्रूला धरले आहे.
लष्कराने जारी केलेल्या ड्रोन व्हिडीओमध्ये सिनवार आर्मचेअरवर बसलेला असतानाच हल्ला झाला आणि नष्ट झालेल्या इमारतीच्या धुराळ्यात तो झाकला गेला.
हमासने स्वतः या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हमासच्या सूत्रांनी सांगितले आहे की त्यांनी पाहिलेल्या संकेतांवरून असे दिसून येते की सिनवारला खरोखर इस्रायली सैन्याने ठार केले.
‘मुख्य अडथळा’
आतापर्यंत या प्रकरणात युद्धविराम होईल अशी पाश्चात्य देशांना आशा होती. मात्र सिनवारच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील शत्रुत्व वाढू शकते आणि तिथे आणखी व्यापक संघर्षाची शक्यता वाढली आहे.
इस्रायलने गेल्या महिन्याभरात लेबनॉनमध्ये ग्राउंड मोहीम सुरू केली आहे आणि आता इराण, हमासचा मित्रपक्ष आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाह 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रतिसाद देण्याची योजना आखत आहे.
गेल्या वर्षी हल्ल्याची योजना आखणाऱ्या मास्टर माइंडला काल ठार करण्यात आले. ज्यामध्ये इस्रायलमधील 1 हजार 200 लोक मारले आणि 250 हून अधिक ओलीसांना पकडल्यचे इस्त्रायली आकडेवारी सांगते. गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायलने 42 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना ठार मारल्यामुळे युद्ध संपविण्याच्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न पुढे ढकलले जाऊ शकतात.
युद्धबंदीबाबत चर्चा?
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांचे फोनवरून. अभिनंदन केले, ते म्हणाले की सिनवारच्या मृत्यूमुळे गाझामधील संघर्ष शेवटी संपुष्टात येण्याची आणि इस्रायली ओलीसांना घरी आणण्याची संधी मिळाली आहे.
अमेरिकेला युद्धविराम व्हावा यासाठी आणि ओलीसांची सुटका करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू करायची आहे, यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, युद्ध समाप्त करण्यासाठी सिनवारचा “मुख्य अडथळा” होता.
या हत्येमुळे इराण आपला पाठिंबा बदलण्याची चिन्हे नाहीत. सिनवारच्या मृत्यूनंतर “प्रतिशोधाची भावना अधिक बळकट होईल,” असे संयुक्त राष्ट्रांच्या मिशनने म्हटले आहे.
इस्रायलविरूद्धचे युद्ध नव्या आणि अधिक तीव्र स्वरूपाच्या टप्प्याकडे जात असल्याचे संकेत देत हिजबुल्लाहने देखील आपला इरादा स्पष्ट केला.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी गुरुवारी मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने सौदी अरेबिया आणि कतारमधील नेत्यांशी स्वतंत्र फोन कॉल करत चर्चा केली, असे परराष्ट्र विभागाने सांगितले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)