चीनने तैवानच्या बेटांजवळ युद्ध सरावाची नवीन फेरी पार पाडल्यानंतर आठवडाभरातच रविवारी अमेरिका आणि कॅनडाच्या युद्धनौकांनी संवेदनशील अशा तैवान सामुद्रधुनीतून प्रवास केला, चीनने या मोहिमेला “तणाव वाढवणारी” संबोधत त्याचा निषेध केला.
अमेरिकन नौदल, अधूनमधून सहयोगी देशांच्या जहाजांसह, महिन्यातून एकदा या सामुद्रधुनीतून प्रवास करते. तैवान हा आपला स्वतःचा भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीननेही धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचा असणारा हा जलमार्ग आपला असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन नौदलाच्या 7 व्या फ्लीटने सोमवारी सांगितले की विनाशकारी यूएसएस हिगिन्स आणि कॅनेडियन फ्रिगेट एचएमसीएस व्हँकुव्हर यांनी रविवारी “आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समुद्रातील नेव्हिगेशन आणि ओव्हरफ्लाइटचे स्वातंत्र्य लागू असलेल्या पाण्यामधून” एक “नियमित” प्रवास केला.
स्वातंत्र्याचे समर्थन
या प्रवासाने अमेरिका आणि कॅनडाची सर्व देशांसाठी असणारे नेव्हिगेशन स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे दर्शविले असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.
“तैवान सामुद्रधुनीत आंतरराष्ट्रीय समुदायाचे नॅव्हिगेशन अधिकार आणि स्वातंत्र्य मर्यादित असू नये. नॅव्हिगेशन, ओव्हरफ्लाइट आणि समुद्र तसेच हवेच्या इतर कायदेशीर वापरांच्या स्वातंत्र्याशी विसंगत सार्वभौमत्व किंवा अधिकार क्षेत्राचे कोणतेही दावे अमेरिका नाकारते,” असे त्यात म्हटले आहे.
चीनच्या ईस्टर्न थिएटर कमांडने सांगितले की त्यांच्या सैन्याने या जहाजांचे निरीक्षण केले आणि त्यांना इशारा दिला.
“अमेरिका आणि कॅनडाच्या या कृतींमुळे त्रास झाला असून ते तैवान सामुद्रधुनी ओलांडून शांतता आणि स्थिरतेला बाधा आणत आहेत,” असे चीनने म्हटले आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की अमेरिका आणि कॅनडाची जहाजे उत्तरेकडील दिशेने निघाली आणि तैवानच्या सशस्त्र दलांनी त्यावर लक्ष ठेवले होते. परिस्थिती “सामान्य” होती.
अमेरिका आणि कॅनडाच्या नौदलाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशी संयुक्त मोहीम आखली होती.
चीनचे दावे
चीनने गेल्या सोमवारी ‘फुटीरतावादी कृत्यांसाठी’ हा इशारा असल्याचे सांगत युद्ध सरावाचे आयोजन केले होते. त्याचा तैवानी आणि अमेरिकी सरकारकडून निषेध करण्यात आला.
चीनचे म्हणणे आहे की जवळजवळ 180 किमी (110 मैल) रुंद जलमार्गावर त्याचे एकट्याचेच अधिकारक्षेत्र आहे जो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक प्रमुख मार्ग आहे. तैवान सामुद्रधुनी हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे असे म्हणत तैवान आणि अमेरिकेने यासंदर्भात वाद घातला आहे.
केवळ तैवानचे नागरिकच आपले भविष्य ठरवू शकतात असे म्हणत तैवानच्या सरकारने चीनच्या सार्वभौमत्वाचे दावे नाकारले आहेत.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)