सिमबेक्स ही सिंगापूर-भारत सागरी द्विपक्षीय सरावाची (SIMBEX) 31वी आवृत्ती 23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडमध्ये सुरू झाली आहे. रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्हीचे (RSN) जहाज RSS Tenacious, हेलिकॉप्टरसह, परवा या महत्त्वपूर्ण सरावात सहभागी होण्यासाठी विशाखापट्टणम येथे पोहोचले.
मुळात 1994 मध्ये ‘लायन किंग’ या नावाने सुरू झालेला सराव नंतर सिमबेक्स नावाने ओळखला जाऊ लागला. आता तो भारतीय नौदल आणि सिंगापूर प्रजासत्ताक नौदल यांच्यातील सागरी सहकार्याचा आधारस्तंभ म्हणून विकसित झाला आहे. या वर्षीच्या सरावाचा उद्देश भारत आणि सिंगापूर यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर केंद्रित असून त्यात आंतरसंचालनीयता वाढवणे, सागरी क्षेत्रातील जागरूकता वाढवणे आणि सामायिक सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य वाढवणे समाविष्ट आहे.
सिमबेक्स 2024 सराव दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहेः बंदर टप्पा आणि सागरी टप्पा. विशाखापट्टणम येथे 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या बंदर टप्प्यात विषय तज्ञांची देवाणघेवाण (एसएमईई), क्रॉस-डेक भेटी, क्रीडा स्पर्धा आणि नौकानयनपूर्व माहिती यांचा समावेश आहे. बंगालच्या उपसागरात 28 ते 29 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या सागरी टप्प्यात, लाइव्ह वेपन फायरिंग, पाणबुडीविरोधी युद्ध (एएसडब्ल्यू) प्रशिक्षण, जमिन विरोधी आणि हवाई विरोधी मोहिमा, नाविक दलांचा सराव आणि सामरिक कसब यांसह प्रगत नौदल कवायतींचा समावेश असेल.
सिमबेक्स 2024 चा उद्घाटन सोहळा गुरुवारी आयएनएस शिवालिकवर आयोजित करण्यात आला. यावेळी पूर्व नौदलाची तुकडी आणि सिंगापूर प्रजासत्ताकाच्या नौदलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा क्षण ठरला.
टीम भारतशक्ती