रॉयटर्सचे पत्रकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांनी पाठवलेल्या सतर्कतेच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी गुप्तचर सेवेच्या माजी प्रमुखांना अटक करण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथे मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हा गोळीबार एका तासाहून अधिक काळ सुरूच राहिल्याचे रॉयटर्सच्या पत्रकारांनी सांगितले.
दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जारी करण्यात आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार – जो रॉयटर्सच्या बघण्यात आला- गोळीबाराची ही घटना राष्ट्रीय सुरक्षा सेवेच्या (एनएसएस) माजी प्रमुखांच्या अटकेशी संबंधित होती. या इशाऱ्यानुसार संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांना आहे त्या ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला, अध्यक्ष साल्वा कीर यांनी 2011 मध्ये सुदानपासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एनएसएसचे नेतृत्व करणाऱ्या अकोल कुर कुक यांना बरखास्त केले आणि त्यांच्या जागी आपल्या मर्जीतल्या सहकाऱ्याची नियुक्ती केली.
लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल लुल रुआई कोआंग म्हणाले की, अकोल कुर यांना अटक करण्यात आलेली नाही आणि गोळीबार होत असताना ते त्यांच्या घरीच होते. इतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शुक्रवारी ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे कोआंग म्हणाले.
विश्लेषकांच्या मते अकोल कुर यांची हकालपट्टी हे सरकारच्या सर्वोच्च स्तरावरील सत्ता संघर्षाचे प्रतिबिंब आहे. डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या निवडणुका दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या जातील, असे कीर यांच्या नेतृत्वाखालील आपत्कालीन सरकारने जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांनी या घडामोडी घडल्या आहेत.
लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल लुल रुआई कोआंग यांनी नंतर कुक यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील गैरसमजामुळे गोळीबार झाल्याचे सांगितले. निवासस्थाना बाहेरील आणि आतील कर्मचारी एकमेकांवर गोळीबार करत होते. तो नेमका कोणत्या कारणाने सुरू झाला हा आता चौकशीचा विषय आहे.
कीर आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष रीक माचर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेल्या प्रतिस्पर्धी गटांमध्ये 2013 ते 2018 या काळात गृहयुद्ध झाले, ज्यात हजारो लोक मारले गेले.
तेव्हापासून दोघांनी आपत्कालीन सरकारचा भाग म्हणून एकत्रित राज्य केले आहे. त्यामुळे देशात तुलनेत शांतता दिसत असली तरी ग्रामीण भागातील सशस्त्र गटांच्या तुकड्यांमध्ये वारंवार होणाऱ्या चकमकीव्यतिरिक्त विरोधी सैन्यांमध्येही अनेकदा संघर्ष उफाळून येतो.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)