अलिकडच्या वर्षांत कॅनडाच्या उत्तरेकडील सीमेवरून अमेरिकेत अवैधपणे प्रवेश करणाऱ्या भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. फॉक्स न्यूजच्या बातमीनुसार अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोलच्या (यूएससीबीपी) आकडेवारीवरून असे दिसून येते की, 2024 मध्ये अमेरिका-कॅनडा सीमा बेकायदेशीरपणे ओलांडून येणाऱ्यांपैकी 22 टक्के भारतीय स्थलांतरित होते.
2022 मध्ये उत्तर सीमेवर पकडल्या गेलेल्या 1 लाख 9 हजार 535 स्थलांतरितांमध्ये 16 टक्के भारतीय नागरिक होते. 2023 मध्ये 1 लाख 89 हजार 402 बेकायदेशीर स्थलांतरितांपैकी भारतीयांची ही संख्या 30 हजार 010 इतकी होती. 2024 पर्यंत स्थलांतरितांची संख्या 1 लाख 98 हजार 929 वर पोहोचली, ज्यात पकडल्या गेलेल्यांपैकी भारतीयांची संख्या 43 हजार 764 होती, जी एकूण संख्येच्या सुमारे 22 टक्के होती.
राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प त्यांची दुसरी टर्म सुरू करण्याच्या तयारीत असताना हे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे सीमा सुरक्षा ही त्यांच्या प्रचारमोहिमेतील आश्वासनांपैकी असणारी महत्त्वाची संकल्पना परत एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
स्थलांतरितांची वाढती संख्या
तज्ज्ञांच्या मते अनेक घटक या सगळ्या घटनेला चालना देणारे आहेत. वॉशिंग्टन डी. सी. मध्ये असलेल्या निस्केनन सेंटर या एका विचारवंत गटाच्या मते कॅनडाला जाणे हा एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. कॅनेडियन व्हिजिटर्स व्हिसासाठीची सरासरी प्रतीक्षा 76 दिवसांची असते, तर अमेरिकन व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळायला जवळजवळ एक वर्ष लागते. कॅनडाची अमेरिकेला लागून असणारी लांब आणि कमी संरक्षित सीमा या घटकांमध्ये भर घालते.
नियंत्रित सीमा टाळून लांब, धोकादायक मार्गांनी कराव्या लागणाऱ्या प्रवासाला आवश्यक मार्गदर्शनासाठी, मदत घेण्यासाठी भारतीय स्थलांतरित अनेकदा 1 लाख अमेरिकन डॉलर्सपर्यंत शुल्क आकारणाऱ्या संस्थांना संपर्क करतात, असे बी. बी. सी. नोंदवले आहे. अनेकजण पंजाबमधून येतात, प्रवासासाठी अनेकदा आपली शेती विकतात किंवा कर्ज घेतात.
स्थलांतरितांची भूमिका
2024 मध्ये, अमेरिकेने मोठ्या प्रमाणावरील चार्टर विमानांच्या मदतीने एक हजारांहून अधिक भारतीय स्थलांतरितांना हद्दपार केले. यातील बहुतेक निर्वासित हे 18 ते 34 या वयोगटातील पुरुष आहे. भारतीय स्थलांतरितांचे मूळ ठिकाण असणाऱ्या पंजाबमध्ये या विमानांनी त्यांना परत आणून सोडले.
गेल्या चार वर्षांत अमेरिकी अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या पश्चिम गोलार्धाबाहेरील स्थलांतरितांच्या सर्वात मोठ्या गटात प्रामुख्याने भारतीय नागरिक आहेत. अलीकडचे अनेक स्थलांतरित हे प्रामुख्याने पंजाबचे आहेत, ज्यांचे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आश्रयाला जाण्याचे प्रमाण तुलनेत जास्त आहे.
एक व्यापक चित्र
प्यू रिसर्च सेंटरच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये, 7 लाख 25 हजार अनधिकृत भारतीय स्थलांतरित अमेरिकेत होते, ज्यामुळे ते मेक्सिको आणि एल साल्वाडोरमधील स्थलांतरितांनंतरचा तिसरा सर्वात मोठा गट बनले. अनधिकृत स्थलांतरितांचे प्रमाण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 3 टक्के आणि परदेशात जन्मलेल्या लोकसंख्येच्या 22 टक्के आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)