चिनी अर्थव्यवस्थेच्या विरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील वाढत्या हालचालींना आळा घालण्यासाठी चिनी उद्योग कंपन्यांनी आपली लढाई सुरू केली आहे. चिनी कंपन्यांनी अमेरिकन चिप्स खरेदी करण्यापासून सावध राहिले पाहिजे कारण त्या “आता सुरक्षित नाहीत.” त्याऐवजी स्थानिक पातळीवर चिप्सची खरेदी केली पाहिजे, असे देशातील चार प्रमुख उद्योग संघटनांनी मंगळवारी चिनी चिप निर्मात्यांवरील वॉशिंग्टनच्या निर्बंधांना उत्तर देताना सांगितले.
गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांनी एकमेकांच्या अर्थव्यवस्थांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे जानेवारीत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतण्यापूर्वीच उभय देशांमधील तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी आयात केलेल्या चिनी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लावण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे अध्यक्ष म्हणून त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळची सुरूवातच व्यापार युद्धाने होणार आहे.
चिप उपकरणे उत्पादक नौरा टेक्नॉलॉजी ग्रुप 002371.SZ सह 140 कंपन्यांच्या निर्यातीला आळा घालत, अमेरिकेने सोमवारी चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगावर तीन वर्षांत तिसरी कारवाई सुरू केल्यानंतर चीनच्या उद्योग संघटनेने हा इशारा दिला.
याचा परिणाम एनव्हीडिया NVDA.O, एएमडी AMD.O आणि इंटेल INTC.O सारख्या अमेरिकन चीप बनवणाऱ्या दिग्गज कंपन्यांवर होऊ शकतो. निर्यात नियंत्रण असूनही चिनी बाजारात उत्पादने विकण्यात या कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत.
प्रमुख चिप निर्मात्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन या अमेरिकेच्या व्यापार संघटनेने म्हटले आहे की, “अमेरिकन चिप्सच्या खरेदीवर मर्यादा घालण्यासाठी चीनमध्ये असा निर्णय घेणे निरुपयोगी आहे आणि अमेरिकन चिप्स ‘आता सुरक्षित किंवा विश्वासार्ह नाहीत’ असा कोणताही दावा केवळ चुकीचा आहे.”
या गटाने म्हटले आहे “निर्यात नियंत्रणे कमी असली पाहिजेत आणि विशिष्ट राष्ट्रीय सुरक्षेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ती लक्ष्यित केली गेली पाहिजेत. आम्ही दोन्ही देशांच्या शासनकर्त्यांना यात आणखी वाढ टाळण्यासाठी प्रोत्साहित करतो.”
या संघटनांमध्ये दूरसंचार, डिजिटल अर्थव्यवस्था, ऑटो आणि सेमीकंडक्टर्ससह चीनच्या काही सर्वात मोठ्या उद्योगांचा समावेश आहे आणि एकत्रितपणे त्यांची संख्या 6 हजार 400 इतकी होते.
प्रसिद्ध झालेल्या निवेदनात अमेरिकन चीप असुरक्षित किंवा अविश्वसनीय का ठरते याबाबत कोणताही तपशील दिलेला नाही.
चीनने मंगळवारी लष्करी उपयोगासाठी, सौर पेशी, फायबर ऑप्टिक केबल्स आणि इतर उत्पादन प्रक्रियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातली. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने सांगितले की, चीनकडून होणाऱ्या इतर ‘बळजबरीच्या कृती’ रोखण्यासाठी अमेरिका आवश्यक पावले उचलेल आणि पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवेल.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)