भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नुकताच बांगलादेशचा दौरा केला. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांची बांगलादेशातून हकालपट्टी झाल्यानंतरचा मिस्री यांचा हा पहिलाच दौरा होता. यादरम्यान त्यांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशिमुद्दीन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बांगलादेशातील अल्पसंख्यांकावर आणि हिंदू प्रार्थनास्थळांवर होत असलेले हल्ले याविषयी मुक्तपणे चर्चा झाली.
सोमवारी ढाका येथे, पत्रकारांशी या भेटीबाबात बोलताना मिस्री म्हणाले की, ‘मोहम्मद जशीमुद्दीन यांच्याशी आमची अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या उघडपणे व्यक्त केल्या. याआधी सप्टेंबरमध्ये त्यांची आणि पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सभेवेळी भेट झाली होती.’
“आजच्या या चर्चेमुळे आम्हा दोघांनाही दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांचा आढावा घेण्याची संधी मिळाली आणि या भेटीदरम्यान चर्चा झालेल्या मुद्द्यांवर आम्ही नक्कीच विचार करु,’’ असंही मिस्री यावेळी म्हणाले.
“भारताला बांगलादेशसोबत सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर फायद्याचे संबंध प्रस्थापित करायचे असून बांगलादेशच्या अंतरिम सरकारसोबत जवळून काम करण्याची भारताची इच्छा आहे”, असेही ते यावेळी म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना मिस्री म्हणाले की, “मी अल्पसंख्याकांच्या सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित असलेल्या आमच्या चिंता मोहम्मद यांच्याकडे व्यक्त केल्या. यादरम्यान आम्ही सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनयिक संपत्तीवरील हल्ल्यांच्या काही खेदजनक घटनांवरही चर्चा केली. बांगलादेश अधिकाऱ्यांनी या सर्व मुद्द्यांवर विधायक दृष्टिकोन ठेवला असून आम्ही दोन्ही देशातील संबंध सकारात्मक दिशेने पुढे जाण्यास उत्सुक आहोत.’’
‘पाकिस्तानी लोकांवरील व्हिसा निर्बंध काढून टाकण्याबाबत तसेच ढाकाने इस्लामाबादकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी केल्याचा अहवाल आणि भारतविरोधी स्पष्ट अजेंडा असलेल्या उजव्या विंग गटांच्या वाढीबद्दल’ची चिंता मिस्री यांनी यावेळी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना मिस्री यांनी व्यापार, वाणिज्य, कनेक्टिव्हिटी, वीज, पाणी आणि ऊर्जा तसेच कॉन्सुलर आणि सांस्कृतिक सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर दोन्ही देशांतील “परस्पर फायदेशीर प्रतिबद्धता” देखील अधोरेखित केली.
दरम्यान मिस्री यांनी अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन आणि मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचीही यावेळी भेट घेतली.
सूर्या गंगाधरन
अनुवाद- वेद बर्वे