एनएसए डोवाल-वांग यांच्यात बैठक
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल 18 डिसेंबर रोजी त्यांचे समकक्ष यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी (एसआर) स्तरावरील चर्चेसाठी चीनला रवाना होणार आहेत.
2020 च्या गलवान संघर्षामुळे संबंध ताणले गेल्यानंतर त्यांच्यात होणारी ही पहिली बैठक असेल. नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेतील सखोल वाटाघाटींनंतर औपचारिकपणे तोडगा काढण्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या.
डोवाल-वांग यी भेट
एनएसए डोवाल यांचे मंगळवारी बीजिंग येथे आगमन होणार असून डोवाल – वांग यांची त्याच दिवशी भेट होणार असल्याच्या बातमीला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. तर बुधवारी त्यांच्यात औपचारिक चर्चा होणार आहे. 2003 मध्ये सुरू करण्यात आलेल्या विशेष प्रतिनिधींमधील (एसआर) ही 23 वी बैठक असेल, असे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नमूद केले.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील एक निवेदन जारी करून जाहीर केले की, “दोन्ही एसआर सीमावर्ती भागात शांतता आणि सलोख्याच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करतील. तसेच सीमावादाबाबत न्याय्य, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह तोडगा शोधतील.”
खरेतर डोवाल आणि यी यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी आता संपली आहे. सूत्रांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की आता या दोघांचे लक्ष प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणे आणि भविष्यासाठी एक आराखडा तयार करणे याकडे असू शकते.
अर्थात भारताने अरुणाचल प्रदेशातील (आसाफिला, यांग्त्से) काही patrolling pointsवर चिनी सैन्याला पुन्हा एकदा गस्त घालण्याची मुभा द्यावी जिथे त्यांचे सैन्य गलवान चकमकीपूर्वी भेट देत असे अशी मागणी चीन करू शकते. याशिवाय कदाचित त्यांच्या इतरही मागण्या असतील, असे सूत्रांनी सांगितले.
3 डीज् : डीसएंगेजमेंट, डी-एस्कलेशन, डी-इंडक्शन
भारताने LACवरून सैन्य आणि इतर साधनसामुग्रीचे Disengagement, De-escalation आणि त्यानंतर De-Induction अशा तीन टप्प्यांची रूपरेषा आखली आहे. यापैकी आतापर्यंत केवळ पहिल्या टप्प्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.
LACवर जेथे सैन्याची तैनाती अभूतपूर्व आहे तेथे तणाव कमी करायचा असेल तर De-escalationचे तार्किकपणे पालन केले पाहिजे. सैन्याची सतत हालचाल आणि मटेरिअल, स्टोरेज आणि स्टॉकिंग ऑपरेशन्समध्ये सतत भर घालणे जेणेकरून sub-zero conditionsमध्येही मनुष्यबळ पुरविले जाईल.
ही परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी आणि शत्रूत्व घटावे यासाठी तणाव कमी करणे आवश्यक आहे, असे सूत्रांनी सांगितले. De-Induction हे त्यानंतर आहे, मुळात दोन्ही बाजूंच्या सैनिकांना गलवान चकमकीपूर्वी ते ज्या मूळ ठिकाणांवर तैनात होते त्या ठिकाणांपर्यंत आणणे यामुळेही संबंध सामान्य करण्याच्या दृष्टीने एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो.
पण त्याआधी, सीमेवर शांतता आणि सलोखा राखण्यासाठी 1990 च्या दशकात चीनने ज्या प्रकारे अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करूनदेखील त्यांना कचऱ्याची टोपली दाखवली त्यावर फेरविचार करणे आवश्यक आहे, कदाचित त्यात दोन्ही बाजूंनी सुधारणा करणे किंवा त्यात पूर्णपणे बदल करणे आवश्यक आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सीमा वाद
सीमा वाद हा अजेंड्यावरील एकमेव मुद्दा नाही. भारतासाठी एक मोठी चिंता म्हणजे वाढती व्यापार तूट, जी आता 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही तूट भरून काढण्यासाठी चीनने अधिक प्रयत्न करावेत, अशी भारताची दीर्घकाळापासूनची मागणी आहे, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
चीन एक धोरणात्मक शस्त्र म्हणून व्यापार करत आहे, असा संशय भारताला (जगाप्रमाणे) आहे. यावेळी परिस्थिती बदलेल का?
आणखी एक मुद्दा असा आहे की चीन भारताकडे अमेरिकेच्या गटातील सहभागी देश म्हणून पाहतो. पण हे खरे नाही. अर्थात हा एक चिनी युक्तिवाद आहे, जो बहुधा भारताच्या चिंतांकडे लक्ष न देण्याच्या हेतूने करण्यात आला आहे.
स्ट्रॅटन्यूज ग्लोबलच्या स्रोतांनुसार….
भारताचे परराष्ट्र धोरण अमेरिकेपासून स्वतंत्र आहे आणि दिल्ली हा अमेरिकेचा उपग्रह (अंकित) नाही हे चीनने समजून घेतले पाहिजे, असे डोवाल पुन्हा एकदा सांगण्याची अपेक्षा आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी चिनी लोकांना यापूर्वी सांगितली गेली आहे, परंतु त्याचा पुनरुच्चार करणे कधीही चांगले.
हे देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे की गेल्या काही वर्षांत एसआर यंत्रणा एक असा मंच बनली आहे जिथे दोन्ही बाजूंनी आण्विक प्रश्नाचा समावेश असलेल्या धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. चीनने एनपीटी (Non-Proliferation Treaty) वर स्वाक्षरी न केल्यामुळे भारताला अधिकृतपणे आण्विशक्तीधारक देश म्हणून मान्यता दिलेली नाही.
अधिकृत आण्विक संवादाने आपली स्थिती डळमळीत करण्याऐवजी, चीनने या उद्देशासाठी एसआर यंत्रणा वापरण्यास प्राधान्य दिले आहे. भारताने आता याला साथ दिली आहे.
विश्वासाची पुनर्बांधणी हा येथे महत्त्वाचा मुद्दा आहे, असे सूत्रांनी सांगितले. गलवानमध्ये आणि त्यानंतर जे घडले ते पाहता, डोवाल आणि यी यांना माहित आहे की त्यांना एका वेळी एकच पाऊल उचलण्याची गरज आहे. जर विश्वास टिकवून ठेवायचा असेल, तो वाढवायचा असेल तर प्रत्येक उचलेले पाऊल क्रमबद्ध आणि अचूक आहे याची त्यांनी खात्री करणे आवश्यक आहे.
नितीन अ. गोखले