मुंबईतील बोट दुर्घटनेत 13 मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

0
मुंबईतील
रॉयटर्स छायाचित्रः मुंबईच्या किनाऱ्यावर प्रवासी बोट उलटल्यानंतर सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान लष्करी हेलिकॉप्टर बोटीवरून उडत असताना

मुंबईतील बोट दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहेः “मुंबईतील बोट दुर्घटना दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहेः पंतप्रधान @narendramodi ”


मुंबईच्या किनाऱ्यावर बुधवारी भारतीय नौदलाच्या बोटीला धडकून 100 हून अधिक प्रवासी असलेली बोट उलटली. या दुर्घटनेत किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाने सांगितले की 99 लोकांची सुटका करण्यात आली असून इतरांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

“18 डिसेंबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास इंजिन चाचणी सुरू असलेल्या नौदलाच्या जहाजाने नियंत्रण गमावले आणि मुंबईतील करंजाजवळ नील कमल या प्रवासी बोटीला त्याने धडक दिली. ही फेरी गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा बेटावर प्रवाशांना घेऊन जात होती,” असे नौदलाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.

खासगी मालकीची नीलकमल नावाची प्रवासी बोट मुंबईच्या किनाऱ्यावरील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या एलिफंटा लेण्यांच्या दिशेने जात असताना अपघातग्रस्त झाली. वर्षभर पर्यटकांचा अखंड राबता असणाऱ्या या लेण्या UNESCO heritage site असून  इ. स. 5व्या-6व्या शतकात बांधल्या गेल्या आहेत. गेटवे ऑफ इंडिया या मुंबईच्या दक्षिणेकडील ठिकाणापासून या बोटी, पर्यटकांना एका तासाच्या अंतरावर असलेल्या एलिफंटा लेण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना नेण्यासाठी नियमित फेऱ्या करतात.

भारतीय नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे की, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. नौदलाची चार हेलिकॉप्टर्स, 11 जहाजे, तटरक्षक दलाची एक बोट आणि सागरी पोलिसांच्या तीन बोटी बचावकार्य करत आहेत.

या भागातील नौदल आणि मच्छिमार बोटींनी वाचवलेल्या प्रवाशांना तातडीने एका जेट्टीमध्ये हलवून जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 99जणांची  सुटका करण्यात आली आहे.या घटनेबद्दल संरक्षणमंत्री सिंह यांनीही शोक व्यक्त केला आहे.

टीम भारतशक्ती

(रॉयटर्स) 

 


Spread the love
Previous articleFocus Of Conflict Now On Strategic City Of Pokrovsk In Ukraine
Next articleभारत – चीनच्या विशेष प्रतिनिधी बैठकीत व्यापार, मानसरोवर यात्रेवर चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here