इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये, 15 महिन्यांपूर्वी सुरू झालेला संघर्ष संपवण्यासाठी, अमेरिकेने युद्धविरामाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अशातच बुधवारी गाझामध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यात 22 जण ठार झाल्याचे वृत्त, पॅलेस्टिनी डॉक्टरांनी दिले आहे.
बुधवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात, गाझा शहरातील शेख रदवान परिसरातल्या एका बहुमजली घरातील 10 लोक ठार झाले, तर जवळच असलेल्या झीटोन उपनगरात अन्य 5 जण मारले गेले, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय मध्य गाझामधील देर अल-बालाह शहरात, जिथे लाखो पॅलेस्टिनी आश्रय घेत आहेत तिथे इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात अन्य 3 लोक मरण पावले.
दुसरीकडे, गाझामधील जबलियामध्ये, जिथे तीन आठवड्यांहून अधिक काळ सैन्याचे ऑपरेशन सुरु आहे, तिथे झालेल्या इस्त्रायली हवाई हल्ल्यात चार लोक मारले गेल्याचे वृत्त, डॉक्टरांनी सांगितले.
मंगळवारी, इस्रायलने गाझा पट्टी ओलांडून केलेल्या लष्करी हल्ल्यांत, किमान 24 पॅलेस्टिनी ठार झाले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच दक्षिणेकडील खान युनिस शहराजवळ असलेल्या, मावासी कॅम्पमध्येही दोन हवाई हल्ले करण्यात आले. ज्यामध्ये १८ जण ठार झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.
या सर्व घटनांवर इस्रायली सैन्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इस्रायलने बॉम्बफेक सुरू ठेवल्यामुळे अमेरिका, कतार आणि इजिप्तने गाझामध्ये युद्धविरामासाठी गेल्या महिन्यात सर्वात तीव्र प्रयत्न केले. याच्याशी संबंधित एका एका स्त्रोताने सांगितले की, युद्धविरामाचा हा करार गाठण्याचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर प्रयत्न होता.
अमेरिकेतील वर्तमान बायडन प्रशासनाने, या शांती करारासाठी अंतिम प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे आणि प्रदेशातील अनेक लोकांचा विचार आहे की, २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होण्यापूर्वीच हा करार होणे आवश्यक आहे.
“गोष्टी पूर्वीपेक्षा चांगल्या आहेत, परंतु अद्याप कोणताही करार झालेला नाही,” असे या स्त्रोताने रॉयटर्सला सांगितले.
मात्र जसजशी वेळ पुढे सरकते आहे, तसतसे दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत आहेत की, त्यांनी अशी अटी ठेवून करार अडवले आहेत, ज्यामुळे गेल्या एका वर्षापासून सर्व शांती प्रयत्नांना धक्का बसला आहे.
हमास आपल्या मागणीवर ठाम आहे की, जर इस्रायलने युद्ध संपवण्यास आणि गाझामधून आपले सर्व सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली तरच ते उर्वरित हॉस्टेजेसना मुक्त करतील. यावर इस्रायलचे म्हणणे आहे, की जोपर्यंत हमासचा पाडाव होत नाही आणि सर्व होस्टेज मुक्त होत नाहीत, तोपर्यंत ते युद्ध संपवणार नाही.
हमासने असाही आरोप केला आहे की, ‘ट्रम्पनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यापर्यंत हॉस्टेजना न सोडल्यास, “विनाश होईल” असे बोलून खूप घाई केली होती.’
इस्लामी गटाचे अधिकारी ओसामा हमदान, मंगळवारी अल्जियर्समध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, “मला वाटते की अमेरिकेच्या अध्यक्षांनी अधिक शिस्तबद्ध आणि मुत्सद्दी विधाने करणे आवश्यक आहे.”
गाझामधील संघर्षामुळे सुमारे 46,000 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, असे एन्क्लेव्हमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या सैनिकांनी इस्रायली प्रदेशात घुसून 1,200 लोक मारले आणि 250 हून अधिक ओलीस पकडले, इस्त्रायली टॅलीनुसार हा हल्ला सुरू करण्यात आला.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)