अमेरिकेने आपल्या निधीला स्थगिती दिली तर त्याचा थेट परिणाम अनेक अफगाण महिलांवर होऊ शकतो. यातील लाखो महिलांना लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य सेवा मिळणे कठीण होईल. अमेरिकेकडून निधीच्या रुपात मिळणाऱ्या पाठिंब्याला सतत स्थगिती मिळाली तर 2025 ते 2028 या कालावधीत अफगाणिस्तानमध्ये 1 हजारांहून अधिक मातांचे मृत्यू होऊ शकतात, अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या मदत अधिकाऱ्याने मंगळवारी व्यक्त केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात, त्यांच्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगतता आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करत, परराष्ट्र विकास सहाय्य निधीला 90 दिवसांच्या स्थगितीचे आदेश दिले. यामुळे अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असलेल्या जगभरातील गटांमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे.
ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय गर्भपातविरोधी करारांमध्ये अमेरिकेचा सहभाग देखील पुनर्संचयित केला आहे. त्यामुळे गर्भपात करणाऱ्या किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या परदेशी संस्थांसाठी अमेरिकन कुटुंब नियोजन निधीमध्ये कपात केली आहे.
सर्वाधिक मृत्यूदर
युनायटेड नेशन्स अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एजन्सीचे ((UNFPA) आशिया आणि पॅसिफिकसाठी असणारे प्रादेशिक संचालक पिओ स्मिथ म्हणाले की, आरोग्य सुविधा बंद झाल्यामुळे अफगाणिस्तानमधील 90 लाखांहून अधिक लोकांना आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या 12 लाखांहून अधिक अफगाण निर्वासितांना सेवांपासून वंचित रहावे लागेल.
अफगाणिस्तानमध्ये गर्भवती महिलांचा मृत्यूदर जगातील सर्वाधिक मृत्यूंपैकी एक आहे, दर दोन तासांनी टाळता येण्याजोग्या गर्भधारणेतील गुंतागुंतीमुळे आईचा मृत्यू होतो, असे ते म्हणाले.
“जेव्हा आपल्या कामासाठी निधी दिला जात नाही तेव्हा काय होते? अस्वच्छ परिस्थितीत महिला एकट्याने जन्म देतात. नवजात बाळांचा प्रतिबंध करण्यायोग्य कारणांमुळे मृत्यू होतो,” असे त्यांनी जिनिव्हा पत्रकार परिषदेत सांगितले. “हे जगातील सर्वात असुरक्षित नागरिक आहेत.”
“जर मी फक्त अफगाणिस्तानचे उदाहरण घेतले तर 2025 ते 2028 यादरम्यान आमच्या अंदाजाप्रमाणे अमेरिकेच्या मदत निधी अभावी 1 हजार 200 अतिरिक्त मातामृत्यू आणि 1 लाख 09 हजार अतिरिक्त अनपेक्षित गर्भधारणा होतील,” असे ते म्हणाले.
आशिया-पॅसिफिक प्रदेशात, UNFPA ला अमेरिकेकडून सुमारे 7.7 कोटी डॉलर्सचा निधी प्राप्त होतो, असे ते म्हणाले.
कुटुंब नियोजनावर परिणाम
इंटरनॅशनल प्लॅन्ड पॅरेन्टहूड फेडरेशनमधील (IPPF) दाता संबंधांच्या संचालक रिवा एस्कीनाझी यांनी रॉयटर्सला सांगितले की, निधी थांबवल्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील कुटुंब नियोजन आणि पुनरुत्पादक आरोग्यसेवा देखील थांबवाव्या लागतील.
“अनपेक्षित गर्भधारणा आणि मातामृत्यूंमध्ये वाढ होण्याची आपण पूर्वकल्पना करू शकतो. आपल्या सदस्यांना गर्भनिरोधक पाठवण्यात अडचण येणार आहे. हा मोठा धक्का आहे,” असे त्या म्हणाल्या.
IPPF हे पुनरुत्पादक आरोग्याचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय संघटनांच्या महासंघाच्या मते, पुढील चार वर्षांत त्याला 13 देशांमध्ये – ज्यापैकी बहुतेक आफ्रिकेतील आहेत – अमेरिकेचा किमान 61 दशलक्ष डॉलर्सचा निधी सोडावा लागेल.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)