मंगळवारी स्वीडनच्या ओरब्रो येथील प्रौढ शिक्षण केंद्रात झालेल्या भीषण गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून, हा देशातील आजवरचा सर्वात भयंकर गोळीबार ठरल्याची पुष्टी, स्वीडन पोलिसांनी केली आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांनी “वेदनादायी दिवस” असे या घटनेचे वर्णन केले आहे.
याबाबत तपास अधिकाऱ्यांचा असा अंदाज आहे की, गोळीबार करणारा हल्लेखोराचा मृत व्यक्तींमध्ये समावेश आहे. दरम्यान, या हल्ल्यातील इतर पीडितांचा सध्या शोध घेतला जात असून, हल्ल्याचा नेमका उद्देश अद्याप अस्पष्ट आहे.
स्थानिक पोलिस प्रमुख- रॉबर्टो ईड फॉरेस्ट एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले: “आम्हाला कल्पना आहे की या घटनेत 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, सध्या आम्ही याविषयीची अधिक तपशीलवार माहिती देऊ शकत नाही.”
घटनेच्या दिवशी संध्याकाळी, स्थानिक पोलिसांनी त्यांच्या वेबसाइटद्वारे जाहीर केले की, “या गोळीबारात एकूण 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र जखमींचा आकडा अजून स्पष्ट नाही. जखमी लोकांच्या नेमक्या स्थितीबद्दल आम्हाला अधिकृत माहिती सध्या देता येणार नाही.”
फॉरेस्ट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ”पोलिसांना विश्वास आहे की गोळीबार करणारा व्यक्ती एकटा होता आणि सध्यातरी या हल्ल्यामागे दहशतवादाचा कोणताही हेतू दिसत नाही, तरीही अनेक गोष्टी अजूनही अस्पष्ट आहेत, त्यामुळे यावर इतक्यात कुठलेही ठोस मत मांडता येणार नाही.” त्यांनी हेही सांगितले की, गोळीबार करणाऱ्या संशयित व्यक्तीचा कोणताही पूर्व रेकॉर्ड पोलिसांकडे नाही.
फॉरेस्ट पुढे म्हणाले की, ”आमच्यासमोर तपासाचे मोठे आव्हान आहे, ज्या शाळेमध्ये हा गोळीबार झाला तो परिसर खूप विस्तारीत असून, तिथले तपासकार्य लवकरात लवकर पूर्ण करणे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. गुन्हेगाराची प्रोफाइल तपासणे, साक्षीदारांच्या मुलाखती घेणे अशी अनेक कामे आम्हाला प्राधान्यक्रमाने पूर्ण करायची आहेत.”
स्टॉकहोमपासून सुमारे 200 किमी (125 मैल) पश्चिमेकडे असलेल्या ओरेब्रो येथे, औपचारिक शिक्षण पूर्ण न केलेल्या किंवा उच्च शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ग्रेड मिळवण्यात अयशस्वी झालेल्या प्रौढांसाठी चालवण्यात येणाऱ्या रिस्बर्गस्का येथील शाळेत हा गोळीबार झाला. याच कॅम्पसमध्ये मुलांसाठीच्या अन्य शाळा देखील आहेत.
अली एलमोकाद नामक एक व्यक्ती, ओरेब्रो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या बाहेर त्याच्या नातेवाईकांना शोधत होता. गोळीबारात ते जखमी झाले की मरण पावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
“आम्ही दिवसभर त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आम्ही यशस्वी झालो नाही,” असे तो म्हणाला, त्याचा एक मित्र होता जो नातेवाईकांना शोधण्यासाठी शाळेतच्या आतही गेला होता. तिथे त्याने जे पाहिले ते खूप भयानक होते. तिथे जमिनीवर लोकांचा खच आणि रक्तचा सडा होता.”
छापेमारीची कारवाई
पोलिसांनी सांगितले की, ते अजूनही गुन्हेगारी क्षेत्रात तपास करत आहेत आणि हल्ल्यानंतर त्यांनी ओरब्रोमध्ये अनेक पत्त्यांची तपासणी केली आहे.
मंगळवारी उशिरा, पोलिसांच्या अनेक व्हॅन्स आणि त्यांची एक मोठी फौज ओरब्रोच्या मध्यभागातील एक अपार्टमेंटच्या बाहेर उपस्थितीत होती, ज्यांच्याद्वारे घटनास्थळी आणि आसपासच्या भागात छापेमारी करण्यात आली.
“आम्ही खूप शस्त्रधारी पोलिसांना परिसरात वावरताना पाहिले, आम्ही आमच्या घरात होतो तेव्हा बाहेरून मोठा गोंधळ ऐकू येत होता,” असे त्याच इमारतीत राहणाऱ्या, ४२ वर्षीय लिंगम तुहोमाकी या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सर्वात भयंकर गोळीबार
पंतप्रधान उल्फ क्रिस्टेरसन यांनी सांगितले की, ‘हा स्वीडनच्या इतिहासातील सर्वात भयंकर सामूहिक गोळीबार आहे.’
“आज जे घडले आहे त्याची संपूर्ण तीव्रता जाणून घेणं कठीण आहे, मात्र या घटनेमुळे स्वीडनवर अंधकार पसरला आहे,” असे मत त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले.
स्विडनचे राजा- कार्ल XVI गुस्टाव, यांनी आपल्या शोकसंदेशांद्वारे म्हटेल की, “मी माझ्या कुटुंबासोबत, ओरब्रोतील या भयंकर घटनेचा साक्षीदार ठरलो आहे, हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे.”
युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष- उर्सुला व्हॉन डेर लेयेन, यांनी X द्वारे आपल्या सहवेदना करत म्हटले की, “या अंधकारमय क्षणी, आम्ही स्वीडनच्या लोकांसोबत उभे आहोत.”
‘आम्ही थेट धावत सुटलो’
या शाळेतील शिक्षिका- मारिया पेगाडो (54 ) यांनी फोनवरुन रॉयटर्सला सांगितले की, ”जेवणाच्या सुट्टीनंतर कोणीतरी त्यांच्या वर्गाचा दरवाजा उघडला आणि अचानक सर्वांना बाहेर पळण्याची सूचना केली. मी त्वरित माझ्या सर्व 15 विद्यार्थ्यांना बाहेर हॉलवेमध्ये नेले आणि आम्ही थेट धावत सुटलो. त्यावेळी आम्ही फायरिंगचे दोन शॉट्स ऐकले. त्यानंतर आम्ही धावतच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. तिथे मी काही लोकांना, जखमींना बाहेर ओढताना पाहिले. आधी एक, मग त्यामागून दुसरा. त्यावरुन मला समजले की परिस्थीती खूप गंभीर आहे,”
स्वीडनच्या या शाळा प्रणालीतील बरेच विद्यार्थी हे स्थलांतरित आहेत, जे त्यांचे मूलभूत शिक्षण सुधारू इच्छितात आणि स्वीडिश शिकत असताना नॉर्डिक देशात नोकऱ्या शोधण्याकरता पदवी मिळवू इच्छितात.
स्वीडनमधील स्थानिक टोळी गुन्हेगारीच्या समस्येमुळे, स्वीडन अशाप्रकारच्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटांशी झुंज देत आहे, ज्याने अलिकडच्या वर्षांत, 10 दशलक्ष लोकांच्या देशातला बंदूक हिंसाचाराचा सर्वाधिक दर नोंदवला आहे. तथापि, शाळांवर जीवघेणे हल्ले फार कमी झाले आहेत.
दुर्मिळ घटना
स्वीडनच्या राष्ट्रीय गुन्हे प्रतिबंधक परिषदेनुसार, 2010 ते 2022 दरम्यान शाळांमध्ये झालेल्या अशाप्रकारच्या सात प्रकरणांमध्ये एकूण 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्वीडनमध्ये युरोपीय मानकांच्या तुलनेत शस्त्रसाधनांची पातळी अधिक आहे, जी मुख्यतः शिकारशी संबंधित आहे. मात्र तरीही ती अमेरिकेपेक्षा खूप कमी आहे. तरी या घटनेमुळे, स्वीडनमधील टोळी गुन्हेगारीच्या लाटेतील बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे.
गेल्या दशकातील हाय-प्रोफाइल गुन्ह्यांपैकी पहिल्या घटनेत, म्हणजे 2015 मध्ये वर्णद्वेषी हेतूने एका 21 वर्षीय मुखवटाधारी हल्लेखोराने एक शिक्षक सहाय्यक आणि एका मुलाची हत्या केली होती आणि इतर दोन जणांना जखमी केले होते.
तर 2017 मध्ये, एका डिपार्टमेंटल स्टोअरजवळ, स्टॉकहोममधील ट्रक चालवणाऱ्या एका व्यक्तीने दुकानदारासह ग्राहकांना धडक दिली होती. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)